Wed, May 22, 2019 14:18होमपेज › Satara › सातार्‍यातील डफळे हौद बिल्डरच्या घशात

सातार्‍यातील डफळे हौद बिल्डरच्या घशात

Published On: Sep 12 2018 1:50AM | Last Updated: Sep 11 2018 11:28PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील एलईडी पथदिवे बसवण्याचे जवळपास निम्मे काम रखडले असताना आणि बसवलेल्या पथदिव्यांची देखभाल दुरुस्तीच्या नावाने बोंब असताना सांगलीच्या कंत्राटदार प्रज्वल भारत लि. या कंपनीचे कंत्राट कायम ठेवण्यावर दोन्ही आघाड्यांचं ‘जमलं’. मात्र, मंगळवार पेठेतील ऐतिहासिक डफळे हौद चोरीला गेल्याची तक्रार करत काही नगरसेवकांच्या आरोपांनी सभागृह दणाणलं. बिल्डरने डफळे हौदावर इमारत बांधली असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सभागृहात झाली. नगरपालिका प्रशासनाने हौद बिल्डरच्या घशात घातला, असा आरोप नगरसेवकांनी केला.

सातारा नगरपालिकेची सभा श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभागृहाच्या नावात बदल करण्यास सर्वांनी पाठिंबा दिल्याबद्दल आशा पंडित सर्वांचे आभार मानले. त्यानंतर अशोक मोने म्हणाले, गणेश विसर्जनाचा प्रश्‍न हायकोर्टाने सोडवला. मंगळवार तळे खुले झाले. नगरपालिकेने केलेला ठराव तसेच हायकोर्टात नव्याने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र यांचा विचार करून मंगळवार तळ्यास परवानगी मिळाली. सर्वांच्या प्रयत्नांना यश आल्याचे मोने यांनी स्पष्ट केले.  अ‍ॅड. डी. जी. बनकर म्हणाले, मंगळवार तळे ही खासगी मालमत्ता असल्याने संबंधित मालक आणि नगरपालिकेने त्याबाबत निर्णय घ्यावा. त्यासाठी आमच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले. मोती तळे तसेच फुटका तलावात विसर्जन करताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे नियम पाळावेत, असेही कोर्टाने बजावल्याचे अ‍ॅड. बनकर यांनी स्पष्ट केले. 

अशोक मोने म्हणाले, शहरातील एलईडी दिव्यांचे 60 टक्के काम सांगलीच्या प्रज्वल भारत या ठेकेदाराने केले असून शहरात बसवलेल्या 3 हजार 600 दिव्यांपैकी 400-500 दिवे कायम बंद असतात. त्याला कामाची वर्कऑर्डर दिली, पण त्याच्याबद्दल प्रचंड तक्रारी आहेत.     

तत्कालीन विद्युत अभियंता सुभाष भावी यांनी या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, असे पत्र दिले होते. त्याचे पुढे काय झाले? एलईडी दिव्यांसाठी आता ई. ई. एस. एल. शासनाने सुचवलेल्या या कंपनीसोबत करार करावा लागणार आहे. या कंपनीच्या कामापेक्षा प्रज्वल भारत ठेकेदार कंपनीचे दर कमी असल्याने याच कंपनीला कारभारात सुधारणा करण्यास सांगून काम द्यावे, अशी सूचना मोने यांनी केली. प्रज्वल भारत कंपनीने शहरात 2 कोटींचे काम केले. मात्र, उर्वरित काम अद्यापही झाले नसल्याची तक्रार दिपलक्ष्मी नाईक यांनी केली. वसंत लेवे म्हणाले, शासन निर्णय येवून वर्ष झाले. करार 4 महिने उशिरा होत असल्याने दोषी अधिकार्‍यावर कारवाई झाली पाहिजे.  फुटकळ दादागिरी करणार्‍यांनी प्रज्वल भारत या कंत्राटदाराला एलईडीचे काम दिले. शहरातील 5 टक्के पथदिवे बंद असतील तर त्या ठेकेदाराच्या बिलातून रक्कम कापून घ्यावी, अशी तरतूद असतानाही या ठेकेदाराची संपूर्ण बिले का काढण्यात आली? ज्या अधिकार्‍यांनी चुकीचे काम केले त्यांच्याकडून नुकसानीची रक्कम वसूल करावी. पुन्हा या भस्मासुराला काम द्यावे का? धनंजय जांभळे म्हणाले, प्रभागात प्रत्येक ठिकाणी एलईडी दिवे बंद असतात. त्यामुळे चांगले काम करणार्‍या कंपनीचाच विचार करावा. 
याचवेळी मंगळवार पेठेतील हौद सुशोभिकरणाचा विषय चांगलाच गाजला. वसंत लेवे म्हणाले, मंगळवार पेठेतील डफळे हौद चोरीला गेला आहे. ऐतिहासिक वास्तू शहराच्या सौदर्यात भर टाकत असताना त्या वास्तूंचे संवर्धन झाले पाहिजे. डफळे हौदाचा शोध घ्यावा. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे डफळे हौद चोरीला गेला असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. सिध्दी पवार म्हणाल्या, डफळे हौद बिल्डरच्या घशात घालण्यात आला. त्यावर बहुमजली इमारत बांधण्यात आली. या इमारतीला नगरपालिकेने पूर्णत्वाचा दाखला दिला. यासंदर्भात केलेल्या तक्रारीला प्रशासनाने केराची टोपली दाखवली, असा आरोप पवार यांनी केला. डफळे हौदाची खूण दाखवली जाते मात्र, त्याठिकाणी हौद नसून इमारत आहे. विहिर चोरीला गेली तसा हौद चोरीला गेला असून संबंधितांवर कारवाई होणार का? असा सवाल पवार यांनी केला. 

सुहास राजेशिर्के म्हणाले,  बिल्डरने त्या हौदावर इमारत बांधली आहे. या हौदाचा उतारा असून नियोजन विभागाने फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली.  शंकर गोरे म्हणाले,   याप्रकरणाची संपूर्ण माहिती घेवून चौकशी केली जाईल. अंदाजाने बोलायला नको. उतार्‍यावर संबंधित नावापुढे ‘कंस’ केलेला आहे. बांधकाम परवाने, नकाशे तसेच प्रॉपर्टी कार्ड तपासले जाईल, असे अश्‍वासन दिले.दरम्यान, विषयपत्रिकेवरील सर्व 3 विषय मंजूर करण्यात आले.