Sat, Apr 20, 2019 16:02होमपेज › Satara › दत्ता जाधवशी संभाषण : २ पोलिस निलंबित

दत्ता जाधवशी संभाषण : २ पोलिस निलंबित

Published On: Jun 23 2018 10:44PM | Last Updated: Jun 23 2018 10:38PMसातारा : प्रतिनिधी

जिल्हा पोलिसप्रमुखांनी जिल्ह्यातील नामचीन गुंडांवर मोक्का व तडीपारची कारवाई करून ‘साफसफाईची मोहीम’ तीव्र केली असतानाच असे गुंड वाढण्यामागे पोलिस दलातीलही काहीजण असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मोक्कातील गुंड दत्ता जाधव याला अटक करण्यापूर्वी त्याच्याशी मोबाईलवरून संभाषण केल्याप्रकरणी ए. जी. पवार व एस. सी. शिंदे या दोन पोलिस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. दै. ‘पुढारी’ने ‘पोलिस दलातील झारीतील शुक्राचार्य रडारवर’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा पोलिस प्रमुखांनी संशयित फितुरांची यादी तयार करून चौकशी केली असता, हा प्रकार समोर आला आहे. 

जिल्ह्यातील गुंडांना मोक्का व तडीपारी केल्यानंतर पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलिस दलात साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. ज्या पोलिसांकडून अशा गुंडांना गुप्त माहिती पुरवून त्यांना मदत केली जाते, अशा फितुरांची यादीच तयार केली आहे. यावर दै.‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. 

यामध्ये एलसीबी, जिविशा, शहर, शाहूपुरी व तालुका पोलिस ठाणे रडारवर असल्याचे मांडण्यात आले होते. या वृत्तानंतर एक महिन्याभर पोलिस अधीक्षकांनी या संशयित फितुरांच्या मोबाईलची व मोबाईलवरील संभाषणाची पाठीमागील संवादाची शहानिशा केली. तेव्हा गुंड दत्ता जाधव याच्याशी दोघांनी संवाद साधल्याचे निदर्शनास आले.दत्ता जाधव याच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून त्याच्याशी संभाषण केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी ए. जी. पवार व एस. सी. शिंदे या दोन पोलिस कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. दत्ता जाधव व या दोन कर्मचार्‍यांमध्ये मोबाईलच्या माध्यमातून संपर्क झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत पोलिस दलाकडे यांच्या संभाषणाची ऑडिओ रेकॉर्ड क्लिप प्राप्त झाली आहे. 

या क्लिपवरून पवार व शिंदे हे दोघे सतत दत्ता जाधव याच्या संपर्कात राहून पोलिस दलाच्या  गोपनीय कार्यवाहीबाबत माहिती देत असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. दत्ता जाधवला अटक करण्यापूर्वी हा संपर्क झाला असल्याचे उघड झाले आहे. चोरी, दरोडा आणि मोक्क्यातील आरोपी असलेल्या दत्ता जाधवला अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. त्याचवेळी हे दोन कर्मचारी त्याला माहिती पुरवत होते. या आरोपीला पोलिसांना अटक करायची आहे हे माहित असूनही या दोघांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती दिली नाही. त्यामुळे या कर्मचार्‍यांनी गुन्हेगार असलेल्या जाधव याला एक प्रकारे मदत केल्याचे दिसून आले आहे. 

त्यामुळे कर्तव्यात केलेली चूक, बेशिस्त आणि बेजबादारपणे वागणूक याचा ठपका ठेवत पवार व शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अशा प्रकारे बेशिस्त वागणार्‍या व गुन्हेगारांना मदत करणार्‍या कर्मचारी व अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा संदीप पाटील यांनी दिला आहे. 
दै. ‘पुढारी’ने पोलिस दलातीलच काही पोलिस हे गुन्हेगारांना मदत करत असल्याबाबतचे वृत्त प्र्रसिध्द केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ही पहिलीच कारवाई असून अशा कर्मचार्‍यांची यादीच बनवण्यात आली आहे. जस जसे पुरावे हाती मिळतील तस तशा कारवाया करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.