होमपेज › Satara › सायक्लो कंपनीच्या मालकांवर फसवणुकीचा गुन्हा

सायक्लो कंपनीच्या मालकांवर फसवणुकीचा गुन्हा

Published On: May 24 2018 5:40PM | Last Updated: May 24 2018 6:21PMसातारा : प्रतिनिधी

सातारा येथील सायक्लो कंपनीने कामगारांचा भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) न भरता फसवणूक केल्याप्रकरणी मालक पांडुरंग शिंदेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 36 लाख 14 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे हे प्रकरण असून याप्रकरणी कोल्हापूर येथील ‘पीपीएफ’च्या अधिकार्‍याने सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, सातार्‍यातील कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

पांडुरंग रामचंद्र शिंदे, प्रमिला पांडुरंग शिंदे, राहुल पांडुरंग शिंदे (तिघे रा. राधिका रोड, सातारा) राजन दिनकर फराटे (रा. आसू, ता. फलटण) यांच्यावर गुन्हा दाखलझाला आहे. याप्रकरणी नितीन गंगाधरराव डेकाटे (रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर) यांनी तक्रार दिली असून ते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अधिकारी आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयामार्फत विविध कामे केली जातात. खासगी कंपनीच्या मालकीची व संस्था चालकाने त्यांच्या कर्मचार्‍यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची रक्‍कम कपात करून संबंधित रक्‍कम स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत चलनाद्वारे जमा करणे बंधनकारक आहे. सातार्‍यातील ‘सायक्‍लो ट्रान्समिशन लि.’ मौजे पाटखळ येथे कंपनी असून या कंपनीचा रजिस्टर पीएफ क्रमांकांसह त्याचे सर्व रेकॉर्ड्स आहेत.

भविष्य निर्वाह निधीबाबबत ‘सायक्‍लो कंपनी’ कामगारांच्या पगारातून दरमहा 12 टक्के दराने कपात करुन ती स्टेट बँकेत भरत होती. मात्र, या कंपनीने नोव्हेंबर 2013 ते डिसेंबर 2017 या कालावधीत 213 कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही. 213 या कामगारांच्या संख्येप्रमाणे सुमारे 5 वर्षांचा कालावधी त्यानुसार संबंधित ही रक्‍कम 36 लाख 13 हजार 376 एवढी आहे. ‘सायक्‍लो’च्या वतीने ‘पीपीएफ’ भरण्यापूर्वी कंपनीने मालकाबाबत व जबाबदार व्यक्‍तीचे नावे दिलेले आहे.

‘सायक्‍लो’च्या कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधी भरला नसल्याची ही बाब समोर आल्यानंतर ‘पीपीएफ’ कार्यालयाने ‘सायक्‍लो कंपनी’ला भेट दिली. या भेटीत कंपनीच्या मॅनेजरला तत्काळ कामगारांच्या ‘पीपीएफ’चे संबंधित पैसे भरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, ‘सायक्‍लो कंपनी’ने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे अखेर ‘पीपीएफ’ कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन पोलिसांनी ‘सायक्‍लो कंपनी’च्या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.सातार्‍यातील कंपनीने कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरला नसल्याने व गुन्हा दाखल झाल्याने त्याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. कामगारांमध्ये या घटनेने खळबळ उडाली असून थेट शासकीय अधिकार्‍याने तक्रार दिल्याने त्याबाबत स्वागत होत आहे.