Wed, Apr 24, 2019 11:31होमपेज › Satara › कर्नल संतोष महाडिक स्मारकाची दखल

कर्नल संतोष महाडिक स्मारकाची दखल

Published On: Aug 19 2018 1:26AM | Last Updated: Aug 18 2018 11:31PMसातारा : प्रतिनिधी

गेली तीन वर्षांपासून रखडलेल्या शहीद कर्नल संतोष महाडिक स्मारकाची गंभीर दखल घेतली गेली. या स्मारकासाठी आवश्यक असणार्‍या सर्व परवानग्या पंधरा दिवसांमध्ये देऊन स्मारकाचे काम तत्काळ सुरु करावे, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी दिले. या स्मारकांसंबंधी त्यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याशी चर्चा केली.

कुपवाडा जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हाजी नाका परिसरातील दाट जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या 41 राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. महाडिक हे सातारा तालुक्यातील पोगरवाडी गावचे सुपुत्र  होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात झाले. 1998 मध्ये महाडिक लष्करात विशेष दलात दाखल झाले. त्यांना अतुलनीय शौर्याबद्दल सेना पदकाने गौरवण्यात आलेे. मात्र, या शूरवीराला वीरगती प्राप्त झाली. शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे देशसेवेचे अपुरे स्वप्न त्यांची पत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक या पूर्ण करत आहेत. पतीला वीरमरण आल्यावर स्वाती महाडिक यांनी देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. त्या  आर्मीमध्ये अधिकारीपदावर सेवा बजावत आहेत. महाडिक कुटुंबियांनी  देशासाठी मोठा त्याग पत्करला. शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मृती जतन व्हाव्यात आणि तरुणाईला त्यातून प्रेरणा मिळावी, आत्मबळ मिळावे यासाठी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झालेल्या वायसी कॉलेजसमोर त्यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. हे स्मारक उभारण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली  अकरा जणांची समिती गठित करण्यात आली. मात्र, तीन वर्षांत या समितीकडून फारसे काही झाले नाही. नगरपालिकेने या स्मारकासाठी राखून ठेवलेला 50 लाखांचा निधी लॅप्स होत राहिला. मात्र, संबंधित यंत्रणांकडून स्मारकासाठीचा दगडही हलला नाही. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरील या उदासिनतेवर दै. ‘पुढारी’ने झोत टाकला. माजी सैनिक शंकर माळवदे यांनीही स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून आजी-माजी सैनिक संघटना रस्त्यावर उतरवून आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे प्रशासनाला याची गंभीर दखल घ्यावी लागली.  सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर तसेच पोलिस हवालदार राहुल खाडे यांनी शिष्टाई करुन माळवदे यांची पालकमंत्र्यांशी बैठक घडवून आणली. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघलही  उपस्थित होत्या. शहीद कर्नल संतोष महाडिक स्मारकासाठी संबंधित विभागांच्या परवानग्या पंधरा दिवसांत द्या. याप्रकरणी योग्य ती कारवाई तातडीने करावी, असे स्पष्ट आदेश ना. शिवतारे यांनी दिले. त्यामुळे गेली तीन वर्षांपासून रखडलेल्या या स्मारकाच्या कामास गती मिळणार आहे.