Fri, Jul 19, 2019 19:51होमपेज › Satara › अपघातात दोघे चुलत भाऊ ठार

अपघातात दोघे चुलत भाऊ ठार

Published On: Jun 23 2018 10:44PM | Last Updated: Jun 23 2018 10:35PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात जरंडेश्‍वर नाका येथे एस. टी. व दुचाकी यांच्या झालेल्या भीषण अपघातात वडूथ येथील दोघे चुलत भाऊ ठार झाले. पाहुण्यांकडे जेवण करून घरी परत जात असताना या भावाभावांवर काळाने झडप घातली. दरम्यान, दोघा भावांच्या मृत्यूमुळे रुग्णालय परिसरात कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

हणमंत अनंत शिंदे (वय 38), नागेश गुलाब शिंदे (वय 50, दोघे रा. वडूथ ता. सातारा) अशी ठार झालेल्या चुलत भावांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी रात्री दोन्ही बंधू भाटमरळी येथे पाहुण्यांकडे जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते दोघे दुचाकीवरून (एम. एच. 11 बीटी 4658)  वडूथला  निघाले होते. यावेळी विजापूर-सातारा ही एसटी वाढे फाट्यावरुन साताराकडे येत होती. दोन्ही वाहने समोरासमोर आल्यानंतर भीषण अपघात झाला. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

हा अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळाचे वातावरण भयावह बनले होते. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. एसटीच्या खाली दुचाकी गेली होती. दुचाकीवरील दोन्ही गंभीर जखमींना नागरिकांनी बाहेर काढले. दुचाकी एसटीच्या खाली अडकल्याने मदत करताना अडथळा येत होता. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या दोघांचाही मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, अपघातानंतर या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मृत दोघांची माहिती घेवून पोलिसांनी कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली. शिंदे कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतल्यानंतर दोघांचाही मृत्यू झाल्याचे समजताच त्यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. याप्रकरणी एस.टी.चालक शिवाजी जगू खताळ (रा. धनगरवाडी, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून किशोर सदाशिव शिंदे (रा. वडूथ) यांनी तक्रार दिली आहे.