Fri, Apr 26, 2019 19:20होमपेज › Satara › वैष्णवी बनली अंध पौर्णिमेचे ‘डोळे..!’

वैष्णवी बनली अंध पौर्णिमेचे ‘डोळे..!’

Published On: May 28 2018 1:33AM | Last Updated: May 28 2018 12:44AMकराड : अशोक मोहने

सातवी पास झालेल्या वैष्णवीला सकाळी फोन आला. तुला एफवायबीएमध्ये शिकणारी अंध पौर्णिमा हिचा पेपर लिहायचा आहे. क्षणाचाही विलंब न लावता वैष्णवीची आई आणि स्वतः वैष्णवीही यासाठी तयार झाली. प्रश्‍नांचे स्वरूप कसे असेल? उत्तरपत्रिका दिलेल्या वेळेत लिहून पूर्ण होईल का? मला हे जमेल का? अशा कोणत्याच गोष्टींचे दडपण प्राथमिक शाळेत शिकणार्‍या वैष्णवीने घेतले नाही. मोठ्या आत्मविश्‍वासाने ती परीक्षेला बसली, पेपरही लिहिले.  

तिच्या या धाडसाचे कौतुक शिक्षकांनी केलेच; पण घरची परिस्थिती प्रतिकूल असतानाही शिकण्याची जिद्द उराशी बाळगून एफवायबीएपर्यंत शिक्षणाचा टप्पा गाठणार्‍या अंध पौर्णिमेच्या पाठीवरही शिक्षकांनी शाबासकीची थाप टाकली. 

येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत पदवीची वार्षिक परीक्षा सुरू आहे. जन्मतःच पूर्ण अंध असणारी पौर्णिमा एफवायबीएची परीक्षा देत आहे. तिची लेखनिक म्हणून वैष्णवी तिची उत्तरपत्रिका सोडवत आहे. वैष्णवी प्रश्‍न वाचून दाखवते, पौर्णिमा त्या प्रश्‍नांचे उत्तर तोंडी सांगते आणि वैष्णवी ते लिहिते अशी त्या दोघींची कसरत सुरू आहे. रविवारी तिसरा पेपर झाला. कसलीही अडचन न येता पौर्णिमेची परीक्षा सुरळीत सुरू आहे. 

अंध पौणिमेच्या परीक्षेसाठी एक मुलगी लेखनिक म्हणून अगोदर तयार झाली होती. शुक्रवारी 10.30 ला पहिला पेपर होता. आठ वाजता त्या मुलीचा फोन आला, मला परीक्षेला बसता येणार नाही. पौर्णिमा घाबरली. ऐनवेळी माझा पेपर कोण लिहिणार?  कोणाला सांगायचे? तीने  पं.स. शिक्षण विभागातील अंध प्रवर्गाचे विशेष शिक्षक हणमंत जोशी यांना फोन केला. त्यांनी आगाशिवनगर (मलकापूर) येथील वैष्णवीच्या आईला फोन केला. त्यांना अडचन सांगितली. त्या स्वतः अंध असल्याने क्षणाचा विलंब न करता त्यांनी होकार कळवला. 

नुकतीच सातवी पास झालेली वैष्णवी राहूल खैरे तयार झाली. तिला घरातून रोज परीक्षा केंद्रावर आणण्याची आणि घरी सोडण्याची  जबाबदारी आगाशिवनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सुधीर दादासाहेब जाधव यांनी घेतली. महाविद्यालय प्रशासनाने कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले आणि वैष्णवीला पौर्णिमेची उत्तरत्रिका सोडविण्यास परवानगी दिली.  

नशीब पण बघा, नाव पौर्णिमा पण तिच्या जीवनात कायमचा अंधार. तरीही या अपंगत्वाला कुरवाळत न बसता पौर्णिमा मोठ्या जिद्दीने शिक्षण घेत आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असताना शिक्षणच जीवनातील अंधःकार दूर करेल असा विश्‍वास तीला वाटतो. पौर्णिमा उत्तम जाधव ही पाटण तालुक्यातील मारूल हवेलीची. तिला वडील नाहीत. आई मोलमजुरी करते. अंथरूणाला खिळून असलेली आजी, आई आणि ती हाच तिचा परिवार आणि हेच तिचं जग.

अभ्यासक्रमाची पुस्तके कोणाकडून तरी वाचून घ्यायची.वाचताना ते लक्षात ठेवायच आणि मोबाईलवर रेकॉर्ड करून घेवून ते पुन्हा पुन्हा ऐकायचं. असा पौर्णिमेचा अभ्यास.   ना शिकवणी, ना वाचण्याची क्षमता प्रत्येक गोष्ट दुसर्‍यावर अवलंबून. तरीही तिने शिकण्याची जिद्द सोडलेली नाही. तिच्या जिद्दीला आत्मविश्‍वासाचे बळ देण्याचे मोलाचे काम वैष्णवीसारख्या मैत्रिणी करत आहेत.