होमपेज › Satara › ‘अंनिस’ची सातार्‍यात २० ऑगस्टला रॅली

‘अंनिस’ची सातार्‍यात २० ऑगस्टला रॅली

Published On: Aug 19 2018 1:26AM | Last Updated: Aug 18 2018 11:20PMसातारा : प्रतिनिधी

महाराष्ट्र अंधश्रध्दा  निर्मूलन समितीच्या संघटीत कार्याचे अध्वर्यु डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला दि. 20 ऑगस्ट रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. खुनाच्या तपासातील अक्षम्य दिरंगाई, अजूनही आरोपी मोकाट आहेत याचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा  निर्मूलन समितीच्यावतीने सोमवार दि. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढण्यात येणार आहे.

रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रध्दा  निर्मूलन समितीच्यावतीने  जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 ते 1 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

सकाळी 11.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत जिजामाता अध्यापक विद्यालयात डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिनानिमित्त वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले आहे.सध्यांकाळी 4 वाजता  राजवाडा येथील गोलबागेजवळ मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी  6 वाजता पाठक हॉल येथे जयदेव डोळे यांच्या भाषणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, दिलीप डोंबिवलीकर, उदय चव्हाण व वंदना माने यांनी दिली.