Wed, Apr 24, 2019 16:35होमपेज › Satara › बेकायदा दारू : ५३६ जणांना अटक

बेकायदा दारू : ५३६ जणांना अटक

Published On: May 26 2018 10:32PM | Last Updated: May 26 2018 10:20PMसातारा : आदेश खताळ

राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या सातारा विभागाकडून बेकायदा दारूधंद्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. अधीक्षिका स्नेहलता श्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात झालेल्या कारवाईत 536 जणांना अटक करून त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले. बेकायदा दारू वाहतूकप्रकरणी 47 वाहनांसह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शासनाने दिलेले वसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्क्यांपेक्षा जास्त साध्य करत वर्षात 613 कोटींचा कर सातारा विभागाने शासन तिजोरीत जमा केला.

बेकायदा दारूवरील कारवाईतच यंत्रणा गोलमाल करत आहेत. पोलिसांची कागदोपत्री कारवाई आणि प्रत्यक्ष पकडलेला मुद्देमाल यात ही बरीच तफावत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच ‘रस्ते का माल सस्ते मे’ असाही अनुभव येत असल्याने अशा कारवायांकडे साशंकतेने पाहिले जात आहे. कारवाईच्या पंचनाम्यात जप्त केलेला माल हा शेकडो रुपयांचा, तर जप्त केलेलेे वाहन लाखो रुपयांचे दाखवले जाते. त्यामुळे अवैध दारू विक्रीला चालना मिळत आहे. संशयिताला जामीन मिळेल अशीच व्यवस्था केली जात असल्याने कारवाया फार्स ठरल्या आहेत. मेढा, कुडाळ पोलिसांनी धाडी टाकून अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई केली असता त्यातून मोठे मासे पोलिसांच्या तावडीतून नेहमीच सुटतात कसे? असा सवाल केला जात आहे. कुडाळ, सायगाव परिसरात ठिकठिकाणी बेकायदा दारू धंदे राजरोसपणे सुरु असतानाही पोलिसांकडून या अवैध व्यवसायिकांवर कारवाई होत नाही.   ‘ड्राय डे’ आणि बंदच्या काळात चढ्या दराने दारुची विक्री मोठ्या प्रमाणावर केली जाते. वाई सातारा, पाचगणी, महाबळेश्‍वर परिसरातील दारु दुकानदारांकडून बेकायदेशीर दुकानांना दारु पुरवली जाते. त्यामुळे अवैध दारुने  हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.  कराड, कोरेगाव, खटाव, माण, फलटण या तालुक्यातील निमशहरी भागाबरोबरच मोठ्या गावांमध्ये बेकायदेशीर दारु विक्री केली जात असून कारवाई करण्याची करण्याची मागणी होत आहे. 

राज्य उत्पादन शुल्कच्या सातारा  विभागाने वर्षभरात कारवाई करुन 939 गुन्हे यावर्षी दाखल केले. त्यामध्ये 536 जणांना अटक केली. त्यामध्ये अवैध दारु विक्री करणे, बेकायदेशीरपणे मद्य बाळगणे आदी प्रकरणांमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईमध्ये बेकायदा दारुची वाहतूक करणारी 47 वाहने जप्त करण्यात आली. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने संबंधितांकडून 68 लाख 79 हजार 677 रुपयांचा दंड गोळा केला. या दंडातून 13.37 टक्के महसूल शासनाला मिळाला. सातारा विभागाला गेल्यावर्षी 583 लाख 29 हजार रुपयांचे महसूल गोळा करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट 105.10 ने साध्य करत शासनाला 116.21 कोटींचा अतिरिक्त महसूल सातारा विभागाने मिळवून दिला. एकूण 613 कोटी रुपयांचा कर शासन तिजोरीत जमा करण्यात आला. गेल्यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश दारु दुकाने बंद होऊनही सातारा विभागाने दिल्यापेक्षा जास्त उद्दिष्ट साध्य केले.