Thu, Apr 25, 2019 05:24होमपेज › Satara › २६ वर्षांनंतर लिपिकाला अपहारप्रकरणी शिक्षा

२६ वर्षांनंतर लिपिकाला अपहारप्रकरणी शिक्षा

Published On: Jun 20 2018 1:16AM | Last Updated: Jun 19 2018 11:37PMसातारा : प्रतिनिधी

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिपिक अशोक परशुराम घोरपडे (मूळ रा. गोजेगाव, सध्या रा. जिद्द बंगला, गोडोली, सातारा) याला मुख्य न्यायदंडाधिकारी डी. बी. माने यांनी 11 लाख 92 हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी 7 वर्षे सक्तमजुरी व 6 लाख 30 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सुमारे 26 वर्षांनंतर हा निकाल लागला असून सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, गजानन राजाराम मतकर (रा.नागेवाडी, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली होती. 1993 ते 1996 यादरम्यान अपहाराचा प्रकार घडला होता. केसदरम्यान तक्रारदार यांचा मृत्यू झालेला आहे. तक्रारदार गजानन मतकर हे सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन अध्यक्ष होते. गजानन मतकर हे बाजार समितीचे अध्यक्ष असताना अशोक घोरपडे हा अकाऊंटट कम कॅशियर म्हणून काम करत होता. दि. 5 फेब्रुवारी 1993 ते 31 मार्च 1995 व 8 जून 1996 ते 13 जून 1996 या कालावधीत अपहाराची घटना घडली होती. अशोक घोरपडे याने या कालावधीत ठेवीदारांच्या खोट्या खर्चाच्या पावत्या तयार करुन त्यावर खोट्या सह्या करुन किर्दमध्ये जादा रक्कम दाखवली होती. त्याने एकूण 11 लाख 92 हजार 266 रुपये 32 पैशांचा अपहार केला होता.

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हा अपहार समोर आल्यानंतर तक्रारदार गजानन मतकर यांनी दि. 29 नोव्हेबर 1997 रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास फौजदार जयसिंह रिसवडकर यांनी करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.  खटल्याची सुनावणी सुरु असताना तक्रारदार गजानन मतकर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या गुन्ह्याची तक्रार घेताना त्यावेळी ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत असणारे पोलिस हवालदार महिपती माने यांची व हस्ताक्षर तज्ञ भालचंद्र बिरादार या दोघांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. या प्रकरणात एकूण 18 साक्षीदार तपासण्यात आले.

जिल्हा न्यायालयात सरकार व बचाव पक्षाचा जोरदार युक्तिवाद झाला. अखेर सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी अशोक घोरपडे याला न्यायाधिशांनी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. पुष्पा जाधव यांनी युक्तिवाद केला. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार अविनाश पवार, वैभव पवार व विद्या कुंभार यांनी काम पाहिले. दरम्यान, 26 वर्षापूर्वीच्या या केसमध्ये शिक्षा लागल्याने संबंधित पोलिस व वकिलांचे कौतुक होत आहे.