Sat, Jun 06, 2020 00:26होमपेज › Satara › 1976 च्या महापुराने चुकला होता काळजाचा ठोका !

1976 च्या महापुराने चुकला होता काळजाचा ठोका !

Published On: Aug 07 2019 8:32PM | Last Updated: Aug 07 2019 8:32PM
सातारा : सुनील क्षीरसागर 


1976 सालची ती भयकंपित करणारी रात्र आठवली की अजूनही अंगावर शहारे येतात. त्या रात्रीसारखी गर्जत वाहणारी, भयकंपित करणारी कृष्णामाई नंतर कित्येक वर्षे दिसलीच नाही. कोरेगाव तालुक्यातील धामणेर गावाला वळसा घालून वाहणारी कृष्णामाई त्या रात्री काळ बनतेय की काय ? अशी धास्ती ग्रामस्थांना वाटत होती. कृष्णामाईचा गर्जणारा तो आवाज काळजाचा ठोका चुकवत होता...

1976 नंतर अनेकदा तुफानी पाऊस झाला. कृष्णामाईलाही महापूर आले. पण, 1976 च्या त्या महापूराची सर कोणीही करु शकले नाही. क्षणाक्षणाला वाढणारे पाणी काळजाचा ठोका चुकवत होते. घाटाचं चौथं तबक बुडालं... पाणी नागोबाच्या मंदिराला लागलं, ..अशी चर्चा त्या महापूरावेळी घराघरात होती. काही नदीकाठच्या कुटुंबांनी तर बाड बिस्तारा बांधून, असेल ते किडूक मिडूक घेवून रहिमतपूरच्या बाजूला पाहुण्यांकडे पलायन करायला सुरुवात केली. त्या काळी आताच्यासारखी वाहनेही नव्हती. गर्जत पडणार्‍या पावसात नखशिखांत भिजत गावाबाहेर काही कुटुंबे पडलीही. मात्र गावात राहिलेली सर्वच घरे रात्रभर जागीच होती. जागोजागी कंदिल तेवत होते. 

गावातील रस्त्यातून ग्रामपंचायतीचा शिपाई ‘सावध.. हुशारऽऽ’ म्हणत ग्रामस्थांना सावध राहण्यासाठी रात्रभर हाका देत होता. काही जाणते लोक महापूराच्या पाण्याचा अंदाज घेत नदीकाठानेही फिरत होते. पडणार्‍या संततधार पावसाने क्षणाक्षणाला कृष्णामाईचे पाणी वाढत होते. महापूरचा येणारा आवाज गावकर्‍यांच्या काळजाचा ठोका चुकवत होता. जो तो पाणी गावात शिरेल की काय? या धास्तीत होता. काही जण आपल्या जनावरांच्या  गोठ्याकडेही वारंवार चक्कर टाकत होते. कारण गावसभोवताली कृष्णामाईने अर्धचंद्राकृती विळखा घातला 
होता. 

धामणेर येथील कृष्णा नदीवरील पूल मोठा असून 1975 साली या पुलाचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते आणि पुढच्याच साली 1976 साली महापूराने अवघे गाव हादरले होते. पहाटेपर्यंत महापूराचे पाणी पुलाच्या रेलिंगला थडकू लागले. पुलावरुन थोडे थोडे पाणी वाहू लागले. त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरु लागला. सकाळपर्यंत कृष्णामाईला थोडासा उतार पडला आणि गावकर्‍यांचा जीव भांड्यात पडला. 

1976 सालच्या त्या पुरानंतर ग्रामस्थ निर्धास्त

1976 साली कृष्णेला आलेला तो महापूर भयानकच होता. धामणेर गावाला अर्धचंद्राकृती विळखा घातल्यामुळे धामणेर गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न त्यानंतरच्या काही वर्षात ऐरणीवर आला. मात्र, या ना त्या कारणाने पुनर्वसनाचा तो प्रश्‍न बारगळलाच गेला. कारण 1976 सारखा महापूर कधी आलाच नाही आणि तसा पाऊसही त्यानंतर कधी पडलाच नाही, त्यामुळे धामणेरवासिय कृष्णेला महापूर आला तरी आजही निर्धास्तपणे वावरत असतात.