Wed, Apr 24, 2019 15:32होमपेज › Satara › कृषीपंप कनेक्शनसाठी १२० कोटी

कृषीपंप कनेक्शनसाठी १२० कोटी

Published On: Jan 21 2018 2:55AM | Last Updated: Jan 20 2018 10:34PMसातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यातील प्रलंबित कृषीपंप कनेक्शनसाठी 120 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कामाच्या निविदा मार्च ते एप्रिलअखेर काढण्यात येतील. धोकादायक ट्रान्सफार्मर, वाकलेले विद्युत खांब बदलण्याच्या अनुषंगाने असलेली कामे तत्काळ हाती घेतली जातील. जिल्ह्यातील महावितरणच्या अनुषंगाने असणार्‍या समस्या तात्काळ सोडवल्या जातील, असे आश्‍वासन महावितरणचे प्रकल्प संचालक गिरीश साबू  यांनी दिले. 

विदर्भ, मराठवाड्याचा वीज वितरणाचा अनुशेष संपला तरीही जिल्ह्यातील 12 हजार 832 कृषीपंपांना कनेक्शन देण्यात आलेले नाहीत. त्याअनुषंगाने दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी आ. शशिकांत शिंदे तसेच राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृष्णानगर येथील महावितरणचे कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाव युवक आणि शेतकर्‍यांचा मोर्चा काढला होता. त्यानंतर शुक्रवारी सातारा येथे महावितरणचे प्रकल्प संचालक गिरीश साबू यांच्या विशेष उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीस आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण,  कार्यकारी अभियंता सुनीलकुमार माने, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विहिरीत पाणी असूनही शेतीला पाणी देता येत नसल्याची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली असून त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असल्याचे आमदारांनी निदर्शनास आणून दिले.  त्यानंतर जिल्ह्यातील महावितरणच्या  कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून लवकरच कामे मार्गी लागतील असे गिरीश साबू यांनी स्पष्ट केले. कामांसाठी आवश्यक निधी कर्जरोखे उभारुन करण्यात येणार आहे.  पहिल्यांदा याची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यातून करण्यात येणार आहे.  दोन वर्षात हे काम पूर्ण  करण्यात  येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सातारा पंचायत समिती सभापती मिलिंद कदम, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस गोरख नलवडे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, शेतकरी उपस्थित होते.