Tue, Nov 19, 2019 10:04होमपेज › Satara › पुसेगावमध्ये सेवागिरी यात्रेस प्रारंभ (व्‍हिडिओ)

पुसेगावमध्ये सेवागिरी यात्रेस प्रारंभ (व्‍हिडिओ)

Published On: Dec 12 2017 11:05PM | Last Updated: Dec 12 2017 11:05PM

बुकमार्क करा

खटाव : प्रतिनिधी

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या पुसेगाव (ता. खटाव) येथील सेवागिरी महाराजांच्या ७० व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक यात्रेची सुरुवात श्री सेवागिरी महाराजांच्या पालखी व झेंड्याच्या भव्य मिरवणूकीने झाली. सेवागिरी महाराज की जय, ओम नमो नारायणाच्या जयघोषात, ढोल-ताशा, लेझीम, झांजपथक व बॅण्डपथकाच्या निनादात मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात सेवागिरी यात्रेस प्रारंभ झाला.  

सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव, सरपंच दीपाली मुळे, माजी उपसरपंच संतोष उर्फ बाळासाहेब जाधव यांच्याहस्ते मंगळवारी सकाळी ९ वा. सेवागिरी महाराजांच्या पादुका, पालखी व मानाच्या झेंडाचे विधीवत पूजन व आरती करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानाचा झेंडा व पालखी पूजनानंतर सकाळी १० वाजता पालखी व झेंडा मिरवणूकीस प्रारंभ झाला.  
पुसेगावमधील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांच्या  लेझीम आणि झांज पथकांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. रविवार दि. १७ रोजी मुख्य रथोत्सव विविध मान्यवरांच्या आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.