होमपेज › Satara › शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम करावे : संजीवराजे निंबाळकर

शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम करावे : संजीवराजे निंबाळकर

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 20 2017 11:54PM

बुकमार्क करा

पाटण : प्रतिनिधी

शैक्षणिक गुणवत्ता वाढीला शिक्षकांनी प्राधान्य दिले पाहिजे. शिक्षकांनी दिलेले कार्य प्रामाणिकपणे पार पाडावे. सातारा जिल्हा गुणवत्तेत राज्यात पहिला आहे. गुणाकार भागाकाराच्या पलिकडे जावून काम करण्याची शिक्षकांनी मानसिकता बाळगावी, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
म्हावशी ता. पाटण येथे पाटण पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पं. स.चे माजी सभापती व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती राजेश पवार, कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती मनोज पवार, समाजकल्याणचे सभापती शिवाजी सर्वगौड, शिक्षणाधिकारी सौ. पुनिता गुरव, पं. स.च्या सभापती सौ. उज्ज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, जि. प. सदस्य बापूराव जाधव, गटविकास अधिकारी संजीव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.पाटण तालुक्यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी आर. पी. निकम यांनी स्वागत केले. म्हावशी जि. प. शाळेतील विद्यार्थीनींनी लिहिलेल्या कवितांच्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.