Mon, Apr 22, 2019 15:40होमपेज › Satara › वाळू चोरांची तलाठ्याला धक्काबुक्की

वाळू चोरांची तलाठ्याला धक्काबुक्की

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 15 2018 12:28AM

बुकमार्क करा
सातारा/वेणेगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यात वाळू तस्करांची मुजोरी सुरूच असून, रविवारी पहाटे कामेरी (ता. सातारा) येथे नदीपात्रातील वाळू चोरत असताना तलाठी व सर्कल त्या ठिकाणी गेल्यानंतर संशयित दोघांनी त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, 5 ब्रास वाळूसह यारी, ट्रॅक्टर असा एकूण 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रशांत सुतार, धनंजय गजानन घाडगे (दोघे रा. कामेरी) यांच्यावर अवैध उत्खनन, शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ, दमदाटीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कैलास बाबुराव म्हैसणवाड यांनी तक्रार दिली असून, ते कामेरी गावचे तलाठी आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी सकाळी कामेरी गावच्या हद्दीत रस्ता नंबर चार येथे बेकायदा उत्खनन होत असल्याची माहिती तलाठी कैलास म्हैसणवाड यांना समजली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता संशयित दोघे यारीच्या माध्यमातून वाळू चोरून ट्रॅक्टरमध्ये भरत होते. या घटनेची माहिती सर्कल यांना देऊन त्यांनाही बोलावून घेतले. तलाठी व सर्कल त्या ठिकाणी गेल्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला; मात्र दहा मिनिटांनंतर पुन्हा येऊन धक्काबुक्की करून ट्रॅक्टर जबरदस्तीने चोरून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवीगाळ व दमदाटीही करण्यात आली. तलाठी म्हैसणवाड व सर्कल जाधव यांना धक्काबुक्की करून धनंजय घाडगे यांनी, 2 लाख, 4 लाख जाऊ दे तुला बघून घेतो, अशी धमकी दिली असल्याची माहिती त्यांनी सांगितली.

या घटनेची माहिती बोरगाव पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पुन्हा ट्रॅक्टर व यारी वाळूसह जप्त करण्यात आली. दरम्यान, वाळू चोरांनी तलाठी व सर्कल यांना दमदाटी केल्याची माहिती पसरल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.