होमपेज › Satara › महाराष्ट्र केसरीचा किताब हातातून निसटला; उपविजेतेपदाबद्दल समाधान

किरणच्या पराभवामुळे माणवासीयांना हुरहूर

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 25 2017 1:18AM

बुकमार्क करा

म्हसवड : पोपट बनसोडे

महाराष्ट्र केसरी या मानाच्या किताबासाठी सज्ज असलेला माणदेशचा पै. किरण भगतच्या कुस्तीकडे अवघ्या सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्याच्यासाठी तमाम माणवासियांनी रविवारी देव पाण्यात घातले होते. परंतु, अभिजित कटकेकडून त्यास पराभव स्वीकारावा लागला अन् माणदेशीयांना  हुरहूर लागली आहे. तथापि, किरण भगतच्या रुपाने सातारा जिल्ह्याला उपमहाराष्ट्र केसरी मिळाला आहे. 

सातारा जिल्यातील माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून राज्यात परिचित आहे. हा कायमचा दुष्काळ माणच्या जनतेच्या पाचवीलाच पुजला आहे. या दुष्काळावर मात करण्यासाठी व पोटाची खळगी भरण्यासाठी माण तालुक्याच्या मोही गावातील  रामचंद्र भगत यांचा मुलगा नारायण भगत यांनी  गावाला रामराम करून मुंबापुरीची वाट धरली. स्वत: पैलवान असलेले नारायण कुस्तीचा छंद सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी ठाण्यातील कामोटे येथे मिळेल ते काम करू लागले. रांगड्या  माणदेशातील माणूस शरीराने पिळदार असल्याने हमाली करून घराचा गाडा चालवू लागले.

त्यांना दोन मुले व एक मुलगी असून मोठा मुलगा दत्ता भगत हा सैन्यात आहे तर किरण भगत हा त्यांचा मुलगा आपल्या वडिलाकडून मातीतील कुस्तीची प्रेरणा घेऊन कुस्तीच्या आखाड्यात उतरला. वडील पैलवान होते. त्यांना किरणने कुस्तीत चमकदार कामगिरी करावी व आपले नाव रोशन करावे ही इच्छा मनोमन वाटत होती.

म्हणून त्यांनी किरणला आटपाडी येथील नामदेव बोडरे यांच्या तालमीत घातले व तिथे किरणने कुस्तीचे धडे गिरवू लागला. बाळाचे पाय पाळण्यात दिसू लागल्याचे वस्ताद यांच्या लक्षात आले होते. वडील नारायणराव हे हमाली करून आपल्या लाडक्या मुलाच्या कुस्तीसाठी हाडाची काडं करून हमाली करून किरणच्या खुराकाचा खर्च पुरवत होते. पै. किरण भगतचे प्राथमिक शिक्षण हे कामोटे येथे झाले. शाळेत किरणचे लक्ष नव्हते. त्याने दहावीची परिक्षा मोही, ता. माण येथील  महालक्ष्मी विद्यालयात दिली आहे. तो आता 11वीत शिकत आहे.

रविवारच्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढत त्याने जिंकावी म्हणून सातारा जिल्ह्यासह माण तालुक्यात कुस्तीप्रेमींनी देव पाण्यात घातले आहेत. सर्वांच्याच आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, अंतिम लढतीत अभिजित कटकेकडून त्यास पराभव स्वीकारावा लागला. याची तमाम माणवासियांना हूरहूर वाटत असली. तथापि, त्याने उपविजेते पटकावल्याचे समाधानही असून आगामी काळातही कामगिरीत सातत्य राखून माणदेशचे नाव उंचवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

मोहीच्या सुपुत्रांना अंतिम फेरीत विजयाची हुलकावणी

मोही गावच्याच ललिता बाबरने स्टिपलचेस क्रीडा प्रकारात ऑलिंपिकपर्यंत धडक मारली होती. तथापि, अंतिम फेरीत तिचे सुवर्णपदक हुकले होते. त्याचप्रमाणे रविवारीही महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत किरण भगतला पराभव स्वीकारावा लागला. मोही गावच्या सुपुत्र व सुकन्येने संघर्ष करून विजयी घोडदौड केली मात्र, अंतिम फेरीत त्यांना विजयाने हुलकावणी दिली.