Sun, Jul 21, 2019 16:15
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › सातारा : कराड आरटीओत आता तीन तासात आरसी बुक

सातारा : कराड आरटीओत आता तीन तासात आरसी बुक

Published On: Mar 16 2018 3:00PM | Last Updated: Mar 16 2018 3:00PMकराड : प्रतिनिधी 

पोस्ट ऑफिसद्वारेच लायसन्स अथवा आरटीओ कार्यालयातील कागदपत्रे, लायसन्स संबंधित व्यक्तीच्या घरी पाठवण्याबाबत कायदा आहे. मात्र असे असूनही कराड आरटीओ कार्यालयाकडून लायसन्स तसेच वाहनांचे आरसी बुक केवळ दोन ते तीन तास देण्यात येत असल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे. यामुळे राज्य शासनाने कराड आरटीओ कार्यालयास लायसन्स तसेच वाहनांचे आरसी बुक थेट वाहन धारकांच्या हातात देण्याबाबत विशेष परवानगी दिली आहे. 

राज्यात केवळ कराड आरटीओ कार्यालयाच ही परवानगी मिळाली असून केवळ तीन तासात सर्व प्रक्रिया पूर्ण करून वाहन धारकांना वाहनांची कागदपत्रे देणारे कराड हे राज्यातील एकमेव कार्यालय ठरले आहे. दोन दिवसांनी होणार्‍या गुढी पाडव्यालाही जवळपास ३०० ते ४०० वाहनधारकांना तीन तासात नवीन वाहनांची नोंदणी करून आरसी बुक देण्याची तयारी पूर्ण केल्याची माहिती कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली आहे. कराड कार्यालयामुळे भविष्यात राज्यभर वाहनधारकांना वाहन नोंदणी (पासिंग) केल्यानंतर तीन तासात थेट हातातच आरसी बुक मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे. दोन महिने कराडमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवला जाणार असून त्यानंतर राज्य शासन पुढील निर्णय घेणार आहे.