होमपेज › Satara › सिग्नल यंत्रणा निकामी करून सालपे जवळ रेल्वे लुटीचा प्रकार ? video

सिग्नल यंत्रणा निकामी करून सालपे जवळ रेल्वे लुटीचा प्रकार ? video

Published On: Aug 19 2018 2:58PM | Last Updated: Aug 19 2018 2:58PMलोणंद : प्रतिनिधी 

पुणे - मिरज लोहमार्गावरील लोणंद पासून सात किलोमीटर अंतरावरील सालपे रेल्वे स्थानकाजवळ सालपे ते तांबवे गावादरम्यान रविवारी पहाटे अडीच सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी होम सिग्नल बॉक्स व त्याची वायर तोडली. सिग्नल न मिळाल्याने दादर -हुबळी ही रेल्वे थांबल्यानंतर तिच्यावर दगडफेक करुन काही प्रवाशांची लुटमार करून दरोडा टाकल्याचा प्रकार घडल्याची चर्चा आहे. याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली  नाही.

 रेल्वे थांबविल्याच्या प्रकाराबाबत रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिसांनी दुजोरा दिला असला, तरी लुटमार झाली की नाही याबाबत मात्र कोणतीही माहीती मिळाली नाही. पुणे - मिरज लोहमार्गावरील लोणंद - वाठार स्टेशन दरम्यान सालपे रेल्वे स्टेशन जवळील सालपे- तांबवे दरम्यान असणाऱ्या होम सिग्नलचा बॉक्स व वायर अज्ञात दरोडेखोरांनी पहाटे सव्वादोन ते अडीचच्या सुमारास तोडले होते. याच दरम्यान दादर -हुबळी  रेल्वे लोणंद येथुन पहाटे दोन वाजुन पाच मिनिटांनी लोणंद रेल्वे स्थानकातुन सालपे कडे मार्गस्थ झाली. परंतु, सालपे स्टेशनच्या अलीकडे सिग्नल न मिळाल्याने चालकाला  रेल्वे थांबवावी लागली. याचाच फायदा घेत दरोडेखोरांनी रेल्वेवर दगडफेक करून दहशत निर्माण केली.

रेल्वेला सिग्नल न मिळाल्याने थांबल्याचे लक्षात येताच त्वरीत रेल्वे अधिकारी , कर्मचारी , रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहचले . याबाबतची कारवाई पूर्ण करून रेल्वे पुढे मार्गस्थ केली. याच दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेसही काही काळ या ठिकाणी थांबवावी लागली होती. काही दरोडेखोरांनी रेल्वेत डब्यात प्रवेश करून काही जणांची लुटमार केल्याची माहिती सांगितली जात आहे. परंतु त्याला कोणीही दुजोरा दिला नाही अथवा दुपारपर्यत कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती. रेल्वे सिग्नल निकामी करण्यात आला होता. निरा येथुन रेल्वे कर्मचारी बोलावून सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यात आली. सालपे रेल्वे स्थानका जवळ घडलेल्या या प्रकाराने रेल्वे प्रवाशात खळबळ उडाली असुन या बाबतच्या घटना स्थळाचा पंचनामा सातारा  रेल्वे पोलिसांनी केला आहे.