Sat, Apr 20, 2019 08:24होमपेज › Satara › रस्त्यावर करता का पीएच.डी.?

रस्त्यावर करता का पीएच.डी.?

Published On: Dec 07 2017 1:31AM | Last Updated: Dec 06 2017 8:50PM

बुकमार्क करा

पुसेसावळी : वार्ताहर

पी.एच.डी.करायचीय...चांगला विषय मिळत नाही? काळजी करु नका.आतापर्यंत कोणी केली नाही, अशा विषयावर पी.एच.डी.करण्याची संधी आपणाला मिळत आहे. पुसेसावळी ते गोरेगाव वांगी जाणार्‍या सुमारे सव्वा किलोमीटर रस्त्याचे पक्के डांबरीकरण.हो हाच विषय आहे. आजपर्यंतचा सगळ्यात हटके विषय असून गेली अनेक वर्षे या रस्त्याचे काम चालल्याने ते केव्हा पूर्ण  होणार हे प्रशासनालाही माहिती नाही. जवळपास दोन वर्षे या रस्त्याचे काम मुंगी पावलाने चालले असून याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

डिसेंबर 2016 मध्ये  या रस्त्याच्या कामाची सुरवात झाली. महिन्याभरात कच्चे डांबरीकरण झाले.तेव्हापासून आजतागायत त्यावर पक्के डांबरीकरण झाले नाही. सध्या या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले आहेत तर पारगाव फाट्यानजीक  रस्ता केला त्याच्या दुसर्‍या दिवशीच तो उखडून खड्डे पडले आहेत. तेही या वर्षभरात मुजविण्यात आलेले नाहीत.

दरम्यान या सव्वा किलोमीटर रस्त्याच्या पुढे सुमारे दोन किलोमीटर अंतरातील रस्ता वाहतुकीस पूर्णपणे खराब आहे.खड्ड्यातून सुमारे तीन ते चार वर्षे ग्रामस्थांचा प्रवास सुरु आहे. हे खड्डे मुजविण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून खडी रस्त्याकडेला पडलेली आहे. आता ही खडी पाहत किती दिवस प्रवास करायचा? असा प्रश्‍न वाहनचालकांना पडला आहे.

गोरेगाव वांगी रस्त्याच्या अपुर्‍या कामाला 2 वर्षे पूर्ण होत आहे.त्यानिमित्त रस्त्यावरील खड्डयात केक कापून या रस्त्याचा वाढदिवस साजरा करणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य नितीन वीर, अमोल कदम व ग्रामस्थ ज्ञानदेव पवार यांनी दिली आहे.