सातारा : प्रतिनिधी
माहेरहून सोने आणण्याच्या कारणावरून पत्नी रिंकू ऊर्फ भाग्यश्री ओसवाल हिचा गळा आवळून खून केल्यााप्रकरणी भरत कांतीलाल ओसवाल (वय 31, रा. आयटीआयजवळ, गुलमोहोर कॉलनी, सातारा) याला बुधवारी जिल्हा सत्र न्यायाधीश डी. ए. ढोलकिया यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, 2014 साली घडलेल्या संबंधित घटनेने त्यावेळी सातारा हादरून गेला होता. महिला आक्रमक होऊन मोर्चाही निघाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी, भरत ओसवाल हा पत्नी रिंकू ऊर्फ भाग्यश्री हिला लग्नावेळी माहेरच्या मंडळींनी कमी दागिने केले यावरून नाराज होता. ठरल्याप्रमाणे उर्वरित आठ तोळे दागिने घेऊन येण्याच्या कारणावरून भरत हा रिंकूचा छळ करत होता. तसेच लग्नाला सुमारे दोन ते तीन वर्षे झाली तरी मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरुनही भरत हा रिंकूशी वारंवार वाद घालत होता. दि. 19 ऑक्टोबर 2014 रोजी रात्री रिंकूला बहिणीचा फोन आला होता. फोनवर बोलत असतानाच भरत तेथे आल्याने, रिंकूने पती आल्याचे सांगत आपण सकाळी बोलू असे म्हणून फोन कट केला. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर भरत याने रिंकूचा गळा आवळला. गळा आवळल्याने रिंकू बेशुध्द पडली. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भरत याने रिंकू ला त्रास होत असल्याचे सांगून तिला उपचाराची गरज असल्याचे कुटुंबियांना सांगितले.
भरत व इतर नातेवाईकांनी रिंकू ला बेशुध्द अवस्थेत सातार्यातील एका रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी झालेल्या वैद्यकीय तपासणीअंती रिंकूचा मृत्यू झाला असल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती रिंकूच्या माहेरच्या मंडळींना समजल्यानंतर त्यांनी सातार्यात धाव घेतली. रिंकूचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगून तो मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला होता. शाहूपुरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.एल. पांढरे हे कर्मचार्यांसमवेत त्याठिकाणी गेले. शवविच्छेदन केल्यानंतर रिंकूचा मृत्यू गळा आवळल्याने झाला असल्याचे सांगण्यात आले. भरत यानेच रिंकूचा गळा दाबून खून केल्याची तक्रार रिंकूची आई चंदा मोहन ओसावाल यांनी शाहूपुरी पोलीस दिली होती.
पोलीस निरीक्षक पांढरे यांनी गुन्ह्याचा तपास करुन दोषारोपपत्र सातारा जिल्हा न्यायालयात सादर केले होते. या खटल्यादरम्यान वैद्यकीय अधिकारी, मृत रिंकूची आई, काका यांच्यासह 11 जणांची साक्ष झाली. साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरुन न्यायाधीश डी.ए.ढोलकिया यांनी भरत ओसवाल याला जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावला. सरकार पक्षातर्फे सुरुवातीला विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. विकास पाटील- शिरगावकर यांची नियुक्ती होती. त्यानंतर जिल्हा सरकारी वकील अॅड. महेश कुलकर्णी यांनी काम पाहिले. प्रॉसीक्युशनचे उपनिरीक्षक पी.के. कबुले, हवालदार सुनील सावंत, अजित शिंदे, शमशुद्दीन शेख, कांचन बेंद्रे, नंदा झांजुर्णे, शाहूपुरीच्या पैरवी अधिकारी शशिकांत भोसले, रिहाना शेख यांनी मदत केली.