होमपेज › Satara › रेवंडीतील मृत्यूप्रकरणी कसून चौकशी

रेवंडीतील मृत्यूप्रकरणी कसून चौकशी

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 10:36PMसातारा : प्रतिनिधी

रेवंडी   ता. सातारा   येथील एका व्यक्‍तीच्या मृत्यूनंतर आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. छेडछाडीच्या घटनेनंतर हा प्रकार घडल्याने संबंधीत मृत्यू नैसर्गिक की घातपात याबाबतची चर्चा दबक्या आवाजात होऊ लागली आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी बुधवारी गावात जावून माहिती घेतली. कसून चौकशीही करण्यात आली असल्याने  या प्रकरणाबाबत गूढ निर्माण झाले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 2 रोजी लक्ष्मण बाबूराव माने  यांचा रेवंडी येथे मृत्यू झाला होता. तत्पूर्वी माने यांच्या नातेवाईकाच्या युवतीची छेड काढल्याने त्यांनी गावातीलच जितेंद्र याच्याकडे विचारणा केली होती.गावातीलच काही जणांनी याप्रकरणी बैठक बोलवून छेडछाडप्रकरणी  संशयिताचा माफीनामाही घेवून त्याला दंड ठोठावला होता. त्यानंतर माने यांचा मृत्यू झाला. छेडछाड व मृत्यू या दोन घटनांचा आता संबंध जोडला जात असून गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले. 

सुमारे 12 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनांनी गेल्या दोन दिवसात उलटसुलट चर्चा सुरु आहे. लक्ष्मण माने यांचा मृत्यू की घातपात? तसेच हे प्रकरण बैठक घेतलेल्यांनी दाबले असल्याची चर्चा धरु लागली. चार दिवसांपूर्वी छेडछाडप्रकरणी संशयित युवकाला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. चौदा दिवसात कोणाचीही तक्रार नसताना अचानक खून झाल्याचे बोलले जावू लागल्यानंतर अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. 

अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. खंडेराव धरणे यांनी बुधवारी दिवसभर रेवंडी गावात जावून माहिती घेतली. दुपारनंतर सातारा तालुका पोलिस ठाण्यातच काही ग्रामस्थांकडे व छेडछाडप्रकरणातील संशयिताकडे कसून चौकशी सुरु होती. रात्री उशीरापर्यंत पोलिसांची चौकशी सुरु असताना कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. 

दरम्यान, मृत लक्ष्मण माने यांना दारुचे व्यसन होते. दुर्देवाने त्यांचा गावामध्ये मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले. तसेच छेडछाड प्रकरणात बैठकीवेळी  संशयितावर दंडाची रक्‍कम ठोठावण्यात आली होती. मात्र दंडाची रक्‍कम दिली गेली नाही व अशातच माने यांचे बरेवाईट झाले असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे.

रेवंडी प्रकरणात चौकशी सुरुच असून संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत तसेच गुरुवारीही चौकशी सुरु राहणार आहे. यामुळे अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

- डॉ. खंडेराव धरणे

पोलिस उपअधीक्षक