Sat, Mar 23, 2019 12:38होमपेज › Satara › फायनान्स कंपनी एजंटानेच रचला कट

फायनान्स कंपनी एजंटानेच रचला कट

Published On: Jun 21 2018 1:20AM | Last Updated: Jun 21 2018 12:08AMकराड : प्रतिनिधी

कर्नाटकातील सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकांचे अपहरण करून साडेचार कोटी लुटणार्‍या कल्याण, ठाणे, मुंबई परिसरातील चौघांना रत्नागिरी पोलिसांकडून कराड पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, उपअधीक्षकांसोबत ज्याचे अपहरण केले होते, त्या फायनान्स कंपनीच्या दिलीप म्हात्रे याने बडतर्फ पोलिसाच्या मदतीने हा कट रचल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.

सातार्‍याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, कराडचे पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, रत्नागिरीचे उपअधीक्षक गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक महेश थिटे, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांची कराडमध्ये संयुक्‍त पत्रकार परिषद झाली. 

यावेळी संदीप पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे, गजानन महादेव तदडीकर (वय 45, रा. रमेशवाडी, मानवपार्क बदलापूर पश्‍चिम कल्याण), विकासकुमार संगमलाल मिश्रा (30, रा. लल्लूसिंगचाळ, जेबीएलआर, दुर्गानगर, जोगेश्‍वरी ईस्ट, मुंबई), महेश कृष्णा भंडारकर (वय 53, विजय गॅलेक्सी टॉवर, प्लॉट नंबर 2405, वाघबीळ, घोडबंदर, ठाणे पश्‍चिम) आणि दिलीप नामदेव म्हात्रे (49, रा. रॉयल अर्पाटमेंट, रूम नंबर 203, जुना बेलापूर रोड कळवा, वेस्ट ठाणे) यांना अटक करण्यात आली आहे. संशयितांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. तदडीकर हा ठाणे पोलिस दलात 1995 पर्यंत कार्यरत होता. पुढे त्याला बडतर्फ करण्यात आले असून, तो संशयित दिलीप म्हात्रे याचा मित्र आहे, असेही तपासातून समोर आले आहे.

इंडी (कर्नाटक) येथील ज्ञानयोगी श्री शिवकुमार स्वामीजी शुगर हा कारखाना वारणानगर (कोल्हापूर) येथील सुभाष पाटील यांना विकत घ्यायचा होता. सेवानिवृत्त उपअधीक्षक बसवराज चौकीमठ यांचा पुतण्या हा त्या कारखान्याचा संचालक आहे. त्यामुळे चौकीमठ आणि चेअरमन गिरीश सारवाड, कार्यकारी संचालक सुधीर बिरादार हे कराडला आले होते. त्याचवेळी ठाण्यातील किंग फायनान्सशी संबंधित दिलीप म्हात्रे हाही कराडमध्ये आला होता.

सुभाष पाटील यांची दिलीप म्हात्रे यांच्याशी ओळख होती. ठाण्यात रिअल इस्टेटचा बिझनेस करणार्‍या म्हात्रेची किंग फायनान्स ही कंपनी असून, सुभाष पाटील यांना म्हात्रेमार्फत 225 कोटींचे कर्ज हवे होते. या कर्जातून पाटील इंडीचा कारखाना विकत घेणार होते. मात्र, 225 कोटीचे मोठे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात साडेचार कोटींची रक्‍कम कमिशन म्हणून देण्याची मागणी म्हात्रे याने केली होती. त्यानुसार चौकीमठ, सारवाड, बिरादार आणि पाटील यांनी विचारविनिमय करून म्हात्रेला कमिशनची रक्‍कम देण्याचे निश्‍चित केले होते. त्या चौघांनी पैसे घेऊन कराडला येणार असल्याचे म्हात्रेला सांगितले होते. मात्र, म्हात्रे याने ही माहिती तदडीकर याच्यासह अन्य संशयितांना देत साडेचार कोटींच्या कमिशनवर समाधान न मानता संपूर्ण रक्‍कम लुटण्याचा कट आखला होता, अशी माहिती समोर आली आहे.

रत्नागिरी, सातारा पोलिसांच्या समन्वयामुळे कट फसला

चिपळूण पोलिस ठाण्यात निवृत्त उपअधीक्षक चौकीमठ आणि संशयित म्हात्रे गेल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक वायंगणकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संपूर्ण रत्नागिरी पोलिसांना संशयितांसह वाहनांची माहिती दिली. तोपर्यंत देवरूखचे पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील व त्यांचे सहकारी दुचाकीवरून संशयितांचा पाठलाग करत देवरूखहून संगमेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेले. संशयितांनी पोलिसांचा पाठलाग पाहून मुंबई - गोवा मार्ग बदलून संगमेश्‍वर, देवरूखच्या ग्रामीण भागातील रस्त्याकडे असेंट कार व स्कॉर्पिओ वळवली.

स्कॉर्पिओतील रक्‍कम असेंटमध्ये ठेवत संशयितांनी पोलिसांना चकवा देण्यासाठी स्कॉर्पिओ एका दिशेला आणि दुसर्‍या दिशेला असेंट कार नेली. मात्र, कोळंबे येथे पोलिस निरीक्षक महेश थिटे यांनी अगोदरच नाकाबंदी केली होती. वाटेत संशयितांनी कारची नंबर प्लेट बदलली होती. मात्र, संगमेश्‍वर बसस्थानक परिसरात कारचा महेश थिटे, इंद्रजित काटकर यांना संशय आला आणि कार अडवली. त्यावेळी संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर थिटे यांनी सहकार्‍यांसह कारची झडती घेतली असता संशयित रंगेहाथ सापडले. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी व्हिडीओ शूटिंगसह अन्य कायदेशीर मार्गाचा अवलंब करत रक्‍कम ताब्यात घेत पुढे कराड पोलिसांच्या हवाली केल्याचे रत्नागिरीचे उपअधीक्षक इंगळे यांनी सांगितले.