Wed, Apr 24, 2019 19:49होमपेज › Satara › सत्ताधार्‍यांची प्रतिष्ठा, विरोधकांचे अस्तित्व पणाला

सत्ताधार्‍यांची प्रतिष्ठा, विरोधकांचे अस्तित्व पणाला

Published On: Feb 13 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 11:18PM रेठरे बु॥ : दिलीप धर्मे 

संवेदनशील  ग्रामपंचायत म्हणून ओळख असणार्‍या  रेठरे बु॥ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 18 जागांसाठी दोन्ही गटांतून तब्बल 154 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.त्यात सत्ताधारी डॉ.भोसले गटातून सर्वात जास्त सरपंचपदासाठी 21 व सदस्यपदासाठी 101 जणांनी उमेदवारी अर्ज  दाखल केले आहेत. तर विरोधी गटातून सरपंचपदास 5 व सदस्यासाठी 32 अर्ज दाखल झाले आहेत.डॉ.भोसले गटाचे प्राबल्य असलेल्या या गावात सत्ताधारांची प्रतिष्ठा तर विरोधकांचे अस्तित्व पणाला लागले असल्याचे चित्र या निवडणूक निमित्ताने समोर आले आहे.  रेठरे बु॥ ची निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेकजण गुडग्याला बाशिंग बांधून सज्ज झाले आहेत.सुरूवातीला ही निवडणूक बिनविरोध होणार, असे चित्र होते परंतु तसे न होता विरोधकांनी पॅनेलची उभारणी केली आहे.

त्यामुळे सध्या पडद्यामागच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.सुरूवातीला गावात शांतता व एकी राहण्यासाठी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले,भाजपचे प्रदेश चिटणीस युवा नेते डॉ.अतुल भोसले,माजी चेअरमन मदनराव मोहिते यांनी बिनविरोधसाठी सकारात्मक भूमिका घेतली होती.त्यास पाठींबा मिळेल असेच चित्र निर्माण झाले होते.परंतु,विरोधक एकत्रित येऊन त्यांनी सर्व जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे दोन पॅनेलमध्ये सरळ सामना रंगणार हे निश्‍चित झाले आहे.अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी सत्ताधारींकडून एकूण 117 व विरोधी गटातून 37 असे 154 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

कृष्णाकाठ म्हटला की राजकारण आणि निवडणुका हे गणित नेहमीच पाहावयास मिळत असते.त्यात रेठर्‍यात निवडणूक म्हटल्यावर सार्‍यांच्या नजरा लागलेल्या  असतात.परंतु, याठिकाणी डॉ.भोसले यांचे प्राबल्य असल्याने विरोधक त्यांचा कसा मुकाबला करणार हा प्रश्‍न आहे. प्रत्येक भावकीवार समोरा समोर उमेदवार असला तरी डॉ.भोसले यांची सत्तास्थाने, कारखाना,हॉस्पिटल,शैक्षणिक  संस्था,बँका याठिकाणी असलेला कामगार,नोकरदार,व्यावसायिक वर्ग मोठा असून गेली अनेक वर्षांचे कामानिमित्त लोकांशी असलेले संबंध ही त्यांची जमेची बाजू आहे.या उलट विरोधकांकडे फारसे काही दिसून येत नसले तरी त्यांनी केलेल्या विरोधी पॅनेलकडे दुर्लक्षही करून चालणार नाही.सत्ताधारींसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची तर विरोधकांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. अर्ज माघारीनंतर दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होईल. तरीही गावात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही गटांनी चांगली  तयारी सुरू केल्याचे दिसून येत  आहे.