होमपेज › Satara › कराडात ढाबा मालकाचे अपहरण

कराडात ढाबा मालकाचे अपहरण

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 10:31PMकराड : प्रतिनिधी 

पुणे - बंगळूर  राष्ट्रीय महामार्गालगत वारूंजी (ता. कराड) गावच्या हद्दीत असणार्‍या समर्थ पाटील या ढाब्याच्या मालकाचे चौघा अनोळखी संशयितांनी अपहरण केल्याची धक्‍कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. विक्रम कृष्णा करांडे (रा. कोडोली, ता. कराड) असे त्या मालकाचे नाव असून बुधवार दुपारपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. 

धैर्यशील दत्तात्रय जगताप (रा. लक्ष्मीनगर, गोळेश्‍वर) यांनी या प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जगताप हे हॉटेल मॅनेजर असून मंगळवारी रात्री ते, मालक करांडे आणि ढाब्यावरील अन्य कर्मचारी ढाब्यावर उपस्थित होते. ढाबा बंद करून आवराआवर करण्याची तयारी सुरू असताना करांडे ढाब्याबाहेर उभे होते. यावेळी साडेअकराच्या सुमारास एक पाढर्‍या रंगाची चारचाकी गाडी त्या ठिकाणी आली. 

जेवण आहे का? अशी विचारणा करत गाडीतील चौघांनी करांडे यांना गाडीजवळ बोलावून घेतले. करांडे गाडीजवळ जाताच एकाने त्यांच्या डोक्यात काही तरी मारत बळजबरीने त्यांना गाडीत बसवले. यावेळी करांडे यांनी आरडाओरड करत जगताप यांना हाक मारली. त्यामुळे जगताप गाडीजवळ जात असतानाच चौघा संशयितांनी गाडी भरधाव वेगाने उंब्रजच्या दिशेने नेली. त्यानंतर जगताप यांनी तातडीने या घटनेची माहिती करांडे यांच्या नातेवाईकांना देत शहर पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर रात्री उशिरा याप्रकरणी चौघा अनोळखी संशयितांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक खान हे गुन्ह्याचा तपास करत आहेत.

बुधवारी दिवसभर विविध पातळ्यांवर चौकशी...

बुधवारी दुपारी पोलिसांनी प्रकार कसा घडला? याची माहिती जाणून घेतली. तसेच आर्थिक वादावरून हा प्रकार तर झाला नाही ना? याबाबतही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मात्र ज्याच्याशी आर्थिक वाद होता, त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे बोलले जात होते. त्यामुळेच घटनेमागचे नेमके कारण काय? याबाबत सायंकाळपर्यंत संभ्रमावस्था होती.