Fri, Jul 19, 2019 07:07होमपेज › Satara › फलटण पालिका सभेत अधिकारी धारेवर

फलटण पालिका सभेत अधिकारी धारेवर

Published On: Jun 29 2018 12:00AM | Last Updated: Jun 28 2018 10:27PMफलटण : प्रतिनिधी

शहरातील वृक्षतोड, भुयारी गटार योजनेतील एसटीपी उभारणी, रिंगरोडवरील दुभाजक व त्यावरील पथदिवे, स्वच्छ सर्वेक्षण योजनेंतर्गत भिंती रंगविण्याचा अवाढव्य खर्च, सभेचे इतिवृत्त उपलब्ध नसणे, लेखा परिक्षण अहवालाची माहिती न देणे या विषयावरुन फलटण नगरपरिषदेची सभा चांगलीच गाजली. काही प्रश्‍नांची उत्तरे न देता आल्याने मुख्याधिकार्‍यांची भंबेरी उडाली तसेच अधिकार्‍यांच्या अर्धवट उत्तरांनी दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ त्यांच्यावर आली. 

फलटण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगर परिषदेच्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सभागृहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. निता नेवसे होत्या. या सभेत 25 विषय सभागृहासमोर  मंजूरीसाठी ठेवण्यात आले होते त्यापैकी बहुतेक विषयावर वादळी चर्चा झाली. विरोधी नगरसेवकांच्या बरोबरीने सत्ताधारी नगरसेवकांनीही प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मनमानी कारभाराबाबत त्यांना धारेवर धरले.

यापूर्वीच्या सभेत सर्वांना इतिवृत्त उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला.  इतिवृत्त सर्वांना पोहोच करु, असे ठरविण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात तसे झाले नसल्याने सर्वांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.  वृक्षारोपणाचा विषय सभेसमोर येताच नगरसेवक  रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी रिंगरोडवरील 67 झाडांची कत्तल केल्याबद्दल अधिकार्‍यांना धारेवर धरले. नगरसेवकाच्या तक्रारीवरुन जर एक झाड तोडले म्हणून गुन्हा नोंद होत असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीस जबाबदार कोण? असा सवाल केला. वृक्ष तोडण्याची भूमिका निषेधार्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासकीय मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावणे ही एक प्रकारे चोरीच असून या प्रकरणी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी रघुनाथराजे यांनी केली. तोडलेल्या वृक्षांचे काय झाले? असा सवाल अनुप शहा यांनी केला. 

शहरातील रिंगरोडवर दुभाजक उभारण्याच्या विषयावर विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोध दर्शविला. नवीन रस्ते दुभाजक उभारण्या अगोदर शहरात पूर्वीचे जे रस्ते दुभाजक आहेत, त्यांची दुरवस्था दूर करण्याची मागणी केली. शहरातील अंतर्गत रस्ते नीट करा मगच नवीन रस्ते दुभाजकाचा विचार करावा, अशी मागणी केली. शहरात भुयारी गटर योजनेकरीता खोदकाम सुरु होणार आहे,  त्याचा फटका या कामास बसेल व सर्व निधी वाया जाईल, असे 

समशेरसिंह यांनी निदर्शनास आणून दिले. रस्ते दुभाजकासाठी उपलब्ध असलेला निधी हे काम झाले नाही तर परत जाण्याची भिती मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी व्यक्त करताच निधी जाऊ नये म्हणून काम करायचे व पुन्हा सहा महिन्यांनी तेच काम नव्याने निधी आणून करणे जनतेच्या सोयीसाठी नसून ठेकेदारांची घरे भरण्यासाठी आहे का? असा सवाल सचिन अहिवळे यांनी उपस्थित केला.
भुयारी गटार योजनेसाठी जागा संपादीत करण्याच्या विषयात दर्शविण्यात आलेल्या सर्व्हे नंबरला सचिन सूर्यवंशी   यांनी जोरदार हरकत घेतली. यात दर्शविण्यात आलेल्या 

सर्वे नंबर 20/2 ब हा नंबरच अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आणून देत नंबर एक  जागा दुसरीच असा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान हा विषय स्थगित ठेवण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत शहरातील सार्वजनिक भिंती रंगरंगोटीच्या कामास मंजूरी देण्यास रघुनाथराजे यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी जोरदार विरोध दर्शविला. या स्पर्धेत रंगरंगोटीस 10 गुण आहेत त्यात नगरपरिषदेस केवळ 2 गुण मिळाले असल्याचे निदर्शनास आणून देत त्यावर 22 लाखांच्या खर्चास मंजूरी कशासाठी? असा सवाल उपस्थित करण्यात आला. 

या सभेत ज्या विभागाशी निगडीत प्रश्‍न विचारले जात आहेत  ते विभाग प्रमुख अर्धवट माहिती देत आहेत. त्यांनी सभागृहाची चेष्टा चालवलीय का? असा सवाल उपस्थित करीत मुख्याधिकारी यांनी या प्रश्‍नी दिलगिरी व्यक्त करावी, अशी 

मागणी रघुनाथराजे यांनी केली. त्यानंतर मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी दिलगीरी व्यक्त केली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळ्यादरम्यान पालखीतळावर (विमानतळ) आवश्यक असणार्‍या कामासाठी 5 लाख 80 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.