Wed, Feb 26, 2020 22:33होमपेज › Satara › आठवणीतला गणेशोत्सव...

आठवणीतला गणेशोत्सव...

Published On: Sep 14 2018 1:33AM | Last Updated: Sep 13 2018 9:06PMवर्षाच्या वर्षावाने तृप्त होवून तृर्षात झालेली धरणी नभाचं दान पिऊन धन्य झाली. शेतातून, डोंगरातून निर्झराचे बांध फुटलेले. डोक्यात घरात बसवलेल्या श्री गणेशाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य गोळा करण्यासाठी थैमान. पावसानं रस्त्यातील गुडघाभर चिखल तुडवत अस्मादिक काही सवंगड्यांना  दुर्वा, केवडा, विविध प्रकारची फुलं आणि कारळ्याची फुले गोळा करण्यासाठी शेतात घेवून घुसले. जिकडे तिकडे मातीचा धुंद करणारा सुगंध आणि सकाळच्या दवाचे मोती लेवून वावरात माजलेली हराळी पाहून कोण आनंद झाला. अनेक शेतातून पिवळ्या जर्द फुलांचे ताटवे...कारळ्याची फुले मंद गतीने वार्‍यावर डोलत असलेली आणि अवघं शेत पिवळसर झालेलं पाहून अस्मादिकांसह मुलांची पलटण खुलली. झालं... भराभर हराळी (दुर्वा)  काढायला सुरुवात झाली. लहानशा मुठीत पुरतील एवढी मुठ दुर्वांची घेवून डोक्यावरील टोपीत पुन्हा कारळ्याचे पिवळं वैभव. श्री गणेशाला आवडणार्‍या माळेसाठी तोडायला सुरुवात. कारळा बहरात आलेला आणि त्याची ती मस्त दरवळ बाप्पांच्या आरतीपर्यंत जावून आली. मधूनच घामाचे ओघळ चिखलभरल्या हाताने पुसता पुसता अस्मादिकांसह  सर्वांची कापडं चिखलानं मस्त रंगली. हर्षभरानं मनाजोगतं कारळ्याचं पिवळं सोनं लुटल्यावर शेजारच्या खळाळून वाहनार्‍या ओहोळात मस्त खेळल्यावर मुलांची टोळधाड शेताशेजारील रस्त्यातून पुन्हा गुडघाभर चिखलातून घराकडे जाते. गणेशोत्सवासाठी आणखी वस्तू गोळा केल्या जातात. हातात दुर्वांची जुडी आणि पांढर्‍या टोपीत कारळ्याची पिवळी धम्मक फुलं घेऊन अस्मादिकांची स्वारी घरी येते. 

सायंकाळची वेळ दुर्वांच्या जुडीतून घरातील सानथोर मंडळीही दुर्वा तयार करायला बसतात. शंभरीकडे निघालेली आज्जी दुर्वाच्या जुडीचं आणि पिवळ्या धम्मक कारळ्यांच्या फुलाचं महत्व अस्मादिकांना सांगते. आरतीची वेळ होते. घरातील सर्वजण आरतीसाठी जमतात. त्यामध्ये आजोबा-आजीपासून काका-काकी अशी घरातील 15-20 जण. श्रीगणेशाला दुर्वां वाहिल्या जातात. कारळ्याच्या फुलांचा विणलेला पिवळाधम्मक हार श्रीगणेशाच्या गळ्यात विराजमान होतो. पाटावर मंद तेवणारी समई.... उदबत्ती.... कसलीही आरास की देखावा नाही... सत्तरच्या दशकात गावात वीजही नव्हती.... बाहेर सोप्यात कंदिलाचा प्रकाश.... आतमध्ये देवघरात  सुखकर्ता... दु:खहर्ता... अशी आरती सुरु होते.... अस्मादिकांच्या हातात छोटासा टाळ.... डोक्यावर टोपी आणि.... वातावरण गणेशमय होते.... प्रत्येकजण त्या आरतीमध्ये तल्‍लीन होवून जातो. अस्मादिकांना श्रीगणेशाच्या गळ्यातील पिवळा धम्मक हार सुखावून जातो.... असा भाव अन् असा देव अस्मादिकांना पुन्हा कधी सापडलाच नाही...!

- सुनील क्षीरसागर