होमपेज › Satara › सूर्य रथावर स्वार : पारंपरिक पद्धतीने रथसप्तमी साजरी (video)

सूर्य रथावर स्वार : पारंपरिक पद्धतीने रथसप्तमी साजरी (video)

Published On: Jan 24 2018 3:12PM | Last Updated: Jan 24 2018 3:13PMसातारा : सुनील क्षीरसागर

रथसप्तमी सणाला हिंदू धर्मात महत्व असून दि. २४ पासून सूर्याचे उत्तरायन सुरू झाले आहे.  याच दिवशी सूर्य रथात बसलेला असून रथातूनच त्याचे उत्तरेकडे मार्गक्रमण सुरू झाले आहे. श्री सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धाकडे वळवत आहेत, या स्थितीला रथसप्तमी म्हटले जाते. हा सण  शेतकर्‍यांसाठी सुगीचे दिवस आल्याचा आणि दक्षिण भारतात हळूहळ वाढणार्‍या तापमानाचा निदर्शक मानला जातो. माग महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य सात घोड्यांच्या रथात बसून प्रवास करतो म्हणून सणाला रथसप्तमी असाही शब्द वापरला जात आहे. 

भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म यामध्ये सूर्याच्या उपासनेला अधिक महत्व असून उगवत्या सूर्याकडे पाहून त्राटक केल्याने डोळ्यांची क्षमता वाढते आणि नेत्र ज्योत अधिक प्रबळ होते. तेजतत्वाची उपासना म्हणजेही सूर्य उपासना मानली जाते. सूर्य नमस्कार घालणे हा महत्वाचा व्यायाम प्रकार असून यामध्ये सूर्याला स्थूल शरीराचा वापर करून नमस्कार करणे म्हणजेच सूर्यनमस्कार होय. सूर्यमंडलातील ग्रह आणि नक्षत्र लोक, शनी लोक आणि ग्रह लोक या सर्व उपलोकांची निर्मिती सूर्यापासूनच झाली असल्याचे मानले जाते. सूर्यापासून प्रक्षेपित होणारा प्रकाश आणि उर्जा यांच्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर चैतन्यही प्रक्षेपित होत असते. या चैतन्यामुळे अनेक जीवांना साधना करण्यासाठी शक्ती मिळते. 

महाराष्ट्रामध्ये रथसप्तमीच्या दिवशी शहरी तसेच विशेषत: ग्रामीण भागामध्ये रथसप्तमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी महिला   त्यांनी सूर्यनारायणाचा धरलेला उपवास या दिवशी सोडतात. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्यही केला जातो. सकाळी घरासमोरील अंगणात सडारांगोळी टाकून चौकोनामध्ये गोवर्‍या पेटवून त्यावर सुगड्यामध्ये दूध ठेवले जाते. सूर्यादयाच्यावेळी गोवर्‍या पेटवून हे दूध  उतू घालवले जाते. त्यानंतर पाटावर देवार्‍यातील सूर्यदेव, कृष्णदेव असे टाक ठेवून त्यांना दह्यादूधाचे स्नान घातले जाते. त्यानंतर या देवतांना शुचिर्भूत करून त्यांची पूजा केली जाते. त्यानंतर  त्यांना पंचामृत, रवा यांचा नैवेद्य दाखवला जातो. याच प्रकारे सूर्याचीही पूजा महिला वर्गाकडून केली जाते. 

रथसप्तमीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. हळूहळू दिवस मोठा होण्याची ही सुरूवात झालेली शास्त्रात स्पष्ट करण्यात आले आहे.