Wed, May 22, 2019 17:06होमपेज › Satara › रंग भक्तीचा अन् बलिदानाचाही

रंग भक्तीचा अन् बलिदानाचाही

Published On: Mar 06 2018 1:55AM | Last Updated: Mar 06 2018 12:17AMसातारा : संजीव कदम 

गोकुळात श्रीकृष्णाबरोबर गोप-गोपिकांनी जी रंगपंचमी साजरी केली त्या रंगपंचमीला  भक्तीचा रंग होता. आपल्या स्वातंत्र्यवीरांनी, क्रांतीकारकांनी, देश भक्तांनी स्वातंत्र्य मिळावं म्हणून देशासाठी बलिदान दिले. या बलिदानाचा रंग होता त्यागाचा व समर्पणाचा.  

सूर्यास्ताला आकाशात नानाविध रंगाची उधळण रविराज करतो ती आकाशाची रंगपंचमी नेहमीच  आपलं मन मोहून घेते. आकाशाचा निळा रंग, शेत शिवाराचा हिरवा रंग, खळखळणार्‍या नद्यातील पाण्याचा   पांढरा  रंग, फांदीवर फुलणार्‍या रंगीबेरंगी फुलांचे विविध रंग, फुलाभोवती गुंजन करणार्‍या भुंग्यांचे रंग, बागेत बागडणार्‍या चिमुकल्या फुलपाखरांचे रंग... अशा विविध रंगांची  रंगपंचमी  आपल्या अवतीभोवती नेहमीच फुलत असते. 

जीवनात रंगांची अखंड बरसात हवीच. त्याचबरोबर विविधरंगी रंगांची उधळणही हवी. मानवी जीवनात जर प्रेम नसेल, आस्था व जिव्हाळा नसेल तर जगणंही रंगतदार होत नाही. रंगपंचमीचे रंग आपल्याला जीवनातले बरेच तत्वज्ञान शिकवून जातात.

ग्रामीण तसेच शहरी भागामध्येही बाळगोपाळांबरोबरच युवक-युवतीही रंगपंचमी खेळत असतात. यावेळी अनेक रंगांची उधळण केली जाते. बाजारांमध्ये उपलब्ध असणार्‍या विविध आकाराच्या व रंगांच्या पिचकार्‍या उपलब्ध असतात. या पिचकार्‍यांतून रंग उधळून पंचमी साजरी केली जाते. 

मित्र-मैत्रिणी, अबालवृद्धही रंगपंचमीच्या उत्सवात सहभागी होतात. काचेच्या रंगांनी अलिकडे या उत्सवाला बेगडी स्वरूप आले असले तरीही रंगपंचमी मोठ्या थाटात साजरी केली जाते.