होमपेज › Satara › भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद..!

भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद..!

Published On: Mar 06 2018 1:55AM | Last Updated: Mar 06 2018 12:19AMसातारा : सुनील क्षीरसागर 

रंगपंचमी म्हणजे विविध रंगांची उधळण करण्याचा उत्सव. या उत्सवामध्ये मोठमोठ्या शहरामध्ये युवक-युवती तसेच बालगोपाळ विविध रंगात रंगतात. प्रेम व त्यागाची तसेच समर्पणाची भावना दर्शवणारा हा उत्सव असून देशाच्या विविध भागात तो मोठ्या उत्साहात खेळला जातो. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि उत्तर भारतात  काही भागात  हा उत्सव अधिक लोकप्रिय आहे.  

होळी सणामागोमाग येणारा अणि सर्वांना हवाहवासा वाटणारा दुसरा सण म्हणजेच रंगपंचमी होय. रंगपंचमी हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला. या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात. रंगपंचमीदिवशी विविध रंगांची उधळण होते. 

रंग... खरंच  प्रत्येक रंगाला एक अर्थ असतो. प्रत्येक रंगाची  एक शिकवण असते. पांढरा रंग शांततेचा, लाल रंग त्यागाचा, हिरवा  रंग समृद्धी दर्शवतो. रंगांमुळेच आपले जीवनसुद्धा आनंदी   बनते.  रंगाची दुनिया जीवनाच्या जगण्याला एक नवा अर्थ देते. म्हणूनच रंगपंचमीच्या या आगळ्या उत्सवात सामील होवून जीवनाचा नवा आनंद लुटण्यासाठी सज्ज होवूया तर... रंग उधळू चला... ! रंग खेळू चला...!

लाकडी पिचकार्‍या कालबाह्य...
आज सर्व काही रेडिमेड बाजारात विकत मिळते. प्लास्टिकच्या पिचकार्‍या बाळगोपाळांसाठी विकत घेतल्या जातात. त्यातून उडणार्‍या पिचकार्‍यांनी बाळगोपाळ आनंदित होतात. पूर्वी लाकडी पिचकर्‍यांचाही एक डौल होता. कळकापासून बनवलेल्या या पिचकार्‍यातून उडणार्‍या पाण्याला प्रचंड दाब देता येत असे. त्यामुळे युवकांमध्येही या लाकड्या पिचकार्‍या लोकप्रिय होत्या. नदीमध्ये  अथवा विहिरीमध्ये पोहताना युवक पोहता पोहता या लाकडी पिचकार्‍यांनी एकमेकांच्या अंगावर पाण्याचे फवारे उडवायचे. या पिचकार्‍या आता कालबाह्य झाल्या आहेत.