Mon, Jul 22, 2019 05:03होमपेज › Satara › रंगपंचमीचा आनंद लुटण्याऐवजी सांस्कृतिक नुकसान

रंगपंचमीचा आनंद लुटण्याऐवजी सांस्कृतिक नुकसान

Published On: Mar 06 2018 1:55AM | Last Updated: Mar 06 2018 12:56AMखेड : अजय कदम

‘बुरा न मानो होली है.! ’ असेच नेमके रंगपंचमी सणाचे झाले आहे. रंगपंचमीचा नैसर्गिक आनंद लुटण्याऐवजी त्याचे मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक नुकसान होताना दिसत असून या बदलत्या रंगपंचमीत आता प्रत्येक ठिकाणी डीजे-डॉल्बीचा  रंग चढू लागला आहे. डीजे डॉल्बीवर बंदी असूनही अनेक ठिकाणी त्याचा वापर होत असल्याने अशा प्रकाराला  यंदा तरी  पायबंद बसणार का? ध्वनी प्रदूषणासह पाण्याचा अतिरिक्त वापरथांबणार का? असे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. 

होळी हा संपूर्ण भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जाणारा सण. या सणाला होळी पौर्णिमा असेही म्हणतात. होलिकोत्सव, धुलिकोत्सव, व रंगोत्सव म्हणजेच होळी . धुलवड व रंगपंचमी . फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी साजरी होते. तर त्यानंतर रंगपंचमी. सर्व साधारण रंगपंचमी म्हटले की मनात रंगीबेरंगी, पाण्याने भरलेले फुगे, पिचकार्‍या, गाणी असे मानले जाते. होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन अर्थात धुलवड. त्यानंतर  येणार्‍या पारंपरिक रंगपंचमी सणात एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करणे, सर्वानी एकत्र येणे, बंधुभाव व एकतेचे प्रतीक म्हणून त्याकडे पाहिले जाते. या दिवशी लोक आपापसातील भेदभाव, भांडणे, राग द्वेष गरिबी श्रीमंती विसरून एकत्र येतात आणि रंगात रंगुन या सणाची परंपरा जोपासतात. 

आता होळी, रंगपंचमीला वेगळे स्वरूप प्राप्त होत आहे. कोणी फुगे उडवणार तर कोणी रसायनमिश्रीत रंगाऐवजी नैसर्गिक रंगाना पसंती देणार असे चित्र दिसते. रंगपंचमी हा मुलांच्या काय अगदी मोठ्या माणसांच्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. रंगपंचमी खेळण्यात एक वेगळा आनंद असतो. आबालवृद्ध हा आनंद लुटतात. अर्थात रासायनिक रंग वापरल्याने आपले नुकसान होतेच शिवाय पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. परंतु आज नवीन ट्रेंड आला आहे, तो म्हणजे डीजेने रंगपंचमी साजरा करण्याचा. मोठमोठे स्पिकर लावून त्यावर जोरजोरात गाणी लावायची आणि नाचत रंगपंचमीचा आनंद लुटायचा. काही ठिकाणी तर पाण्याच्या मोठ्या टँकरचा वापर केला जात असून काही महाभाग तर सोबत  दारूही ठेवत असल्याचे चित्र आहे.  करमणुकीसाठी नृत्य अविष्कारही असतात. शहरी भागात रंगपंचमीचे ‘इव्हेंट’ आयोजित केले जात असून तेथे ’ ड्रेस कोड’  ही ठरवला जातो. गल्ली पासून ते काँप्लेक्समध्ये अशा प्रकरची रंगपंचमी साजरी करण्यात येत आहे. काही गल्ली, काँप्लेक्समध्ये डीजे नसेल तर कारमधील स्पिकरवर गाणी लावली जातात. ग्रामीण भागातही हळूहळू डीजे रंग चढू लागला असून गाण्याच्या ठेक्यावर रंगाची बरसात होवू लागली आहे. 

रंगपंचमी साठी आता इव्हेंट आयोजित करून त्यामध्ये ’रेनडान्स’ करण्याचे फॅड वाढले आहे. यामध्ये पाण्याचा अतिवापर होतो. तर डीजे साऊंड सिस्टीमवर गाणी लावल्याने ध्वनीप्रदूषणही होते. काही ठिकाणी तर  अश्‍लील गाणी लावून बिभत्सपणाने डान्स केला जातो. त्यामुळे तरूण पिढीची अशा प्रकारच्या रंगपंचमीतून संस्कृती बदलत चालली असल्याचे दिसत आहे.