Tue, Jul 23, 2019 06:58होमपेज › Satara › रामदेव बाबांनी उलगडला जीवनपट

रामदेव बाबांनी उलगडला जीवनपट

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 16 2018 8:55PMकराड : प्रतिनिधी

लहानपणी मला जग केवढे मोठे आहे, हे माहितीही नव्हते. पण त्यावेळी महापुरूषांची जीवनचरित्रे मला वाचायला मिळाली आणि मी जीवन सर्वार्थाने जगण्यासाठी घराबाहेर पडलो. कठोर साधना आणि सर्वंकष  अभ्यास, तसेच ज्ञानप्राप्ती व कौशल्यांचा विकास याच्या जोरावरच मी स्वत:ला घडविले, अशा शब्दांत रामदेव बाबा यांनी कृष्णा अभिमत विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपला जीवनपट उलगडला.
 
कृष्णा अभिमत विद्यापीठात रामदेव बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा भारत विद्यार्थी संमेलन आयोजित करण्यात आले होते. रामदेव बाबा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. डॉ. सुरेश भोसले, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, डॉ. जयदीप आर्य, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मिळावे, ही दूरदृष्टी ठेऊन 25 वर्षांपूर्वी कृष्णा मेडिकल कॉलेजची स्थापना करणारे स्व. जयवंतराव भोसले थोर महापुरूष होते. त्यांचा संस्कारक्षम वारसा चालविणारे डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार रामदेव बाबा यांनी काढले. जोपर्यंत लोक आळशी राहतील, तोपर्यंत त्यांना सतत विविध आजार जडतील. त्यामुळे डॉक्टरांची आवश्यकता भासणारच आहे. पण मुळात रोग होऊ नयेत, यासाठी योग करणे आवश्यक आहे. वैद्यकीय विज्ञानात तणावावर कोणतेही औषध निघालेले नाही. पण योगाने तणावमुक्त जीवन जगता येते, हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. 

आजची युवापिढी फेसबुक, यु ट्युबसारख्या सोशल मिडियाच्या जाळ्यात गुरफटल्याने बरबाद होत आहे. अशावेळी युवापिढीने भारताला जगात सर्वश्रेष्ठ बनविण्यासाठी आळस झटकून कामाला प्राधान्य द्यायला हवे. तसेच सोशल मीडियाच्या गुंत्यातून सुटका करून घेऊन ज्ञान व कौशल्ये वाढविण्यासाठी आपली ताकद पणाला लावली पाहिजे. डॉ. सुरेश भोसले यांनी योगाला जगात जीवनपद्धती म्हणून मान्यता मिळवून देण्यात स्वामीजींचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.  

यावेळी रामदेवबाबांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांची दिलखुलास उत्तरेही दिली. या कार्यक्रमाला पतंजली योग समितीचे पदाधिकारी, कार्यकत, कृष्णा विद्यापीठातील विविध विभागांचे विभागप्रमुख यांच्यासह प्राध्यापक, डॉक्टर्स व विद्यार्थी संख्येने उपस्थित होते.
Tags : ramdev baba , baiography,satara news