Sun, Jul 21, 2019 09:55होमपेज › Satara › खा. उदयनराजेंना रिपाइंतून निवडून आणू : ना. रामदास आठवले

उदयनराजेंना रिपाइंतून निवडून आणू : आठवले

Published On: Mar 11 2018 1:09AM | Last Updated: Mar 11 2018 1:09AMसातारा : प्रतिनिधी

खा. श्री. उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेसाठी  जागा दिली नाही तर त्यांना रिपाइंमार्फत तिकीट देऊन निवडून आणण्याची जबाबदारी घेऊ. त्यांचे आमच्या पक्षात स्वागतच होईल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. दरम्यान, सन 2019 च्या निवडणुकीत पुन्हा मोदीच जिंकणार असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

सातारा येथे शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले  म्हणाले, खा. उदयनराजे रिपाइंमध्ये आले तर त्यांचे पक्षात स्वागतच आहे. सक्षम असा हा नेता आहे तसेच ते माझे चांगले मित्र आहेत. मराठा नेता म्हणून रिपाइंमध्ये आले तर पक्षाची ताकद आणखीनच वाढेल. तसेच नारायण राणेंनी रिपाइंमध्ये यायला काय हरकत नाही. हे दोन्ही नेते जर रिपाइंमध्ये आले तर राज्याच्या राजकारणात रिपाइंचा दबदबा वाढेल असेही ना. रामदास आठवले म्हणाले.

राज्याच्या राजकारणावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, केंद्रासारखी राज्यात परिस्थिती नाही. शिवसेना पक्ष सत्तेत असला तरी सातत्याने विरोधाची भूमिका घेत आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सरकारवर करीत असलेली टिका थांबविली पाहिजे. आगामी काळात होणार्‍या निवडणुकामध्ये शिवसेना वेगळी लढली तर त्यांचे नुकसान होणार आहे. शिवसेनेने काहीही भूमिका घेतली तरी रिपाइं भाजपबरोबरच राहणार आहे.

राममंदिरावर बोलताना ना. आठवले म्हणाले, राममंदिराची ही जागा खरे तर बुध्द मंदिराची होती. मात्र, 65  एकर असलेल्या जागेपैकी  45 एकर  जागा राममंदिरासाठी तर उरलेली जागा मशिदीसाठी द्यावी. तसेच कायमचा वाद मिटवायचा असेल तर  सामंजस्याची भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र बसून वाद मिटवण्याचे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 वर्षांत विविध योजना जाहीर केल्या त्यामधून  गोरगरीब जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न  त्यांनी केला आहे. काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचारामुळे  ग्रामीण भागाचा विकास होवू शकला नाही. मात्र, या 4 वर्षांत गरीबांना न्याय मिळाला आहे.सातारा जिल्ह्यातील प्रश्‍नावर बोलताना म्हणाले, सातार्‍यातील सामाजिक न्याय भवनाच्या कामासंदर्भात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी चर्चा करून कुठल्या कारणाने काम रखडले आहे ते बोलून कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यसभेसाठी जागा मागणार का? या प्रश्‍नावर बोलताना ना. आठवले म्हणाले, आम्हाला राज्यसभेसाठी जागा काय मिळणार नाहीत; मात्र 2019  च्या लोकसभा निवडणुकीसाठी 4 ते 5 जागांची मागणी करणार आहे. मी लोकसभेचा कार्यकर्ता आहे. पण नाईलाजाने मला राज्यसभेवर जावे लागले आहे. मला नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी परवानगी दिली तर  मी शिर्डी, दक्षिण मध्य मुंबई, रामटेक, सोलापूर व माढा या मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे सुतोवाच आठवले यांनी केले.

भिमा कोरेगाव प्रश्‍नावर बोलताना ना. आठवले म्हणाले, प्रकाश आंबेडकर आमचे नेते आहेत. समाज भडकला असताना आमच्या पक्षाने सामजस्यांची भूमिका घेऊन हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. वाद निर्माण होवू नये, अशी पक्षाची भूमिका होती. मात्र ज्यांनी हल्ले केले त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असल्याचेही ना. आठवले यांनी सांगितले.यावेळी  रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष किशोर तपासे, जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, अण्णा वायदंडे, फारूख पटनी, दादासाहेब ओव्हाळ, शरद गायकवाड, अप्पा तुपे व पदाधिकारी उपस्थित होते.