Tue, Mar 19, 2019 03:13होमपेज › Satara › अमिताभ बच्चन यांना छत्रपती घराण्याचा शिवसन्मान पुरस्कार जाहीर

सातार्‍यात २५ ते २७ मे अखेर राजधानी महोत्सव

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 11:00PMसातारा : प्रतिनिधी

खा श्री छ. उदयनराजे भोसले फाऊंडेशन  ऑफ कल्चरल अ‍ॅक्टिव्हिटीज यांच्या वतीने दि. 25 ते 27 मे अखेर राजधानी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी सातारा गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान,  छत्रपती घराण्याचा मानाचा शिवसन्मान पुरस्कार बिग बी अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती खा. श्री छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राजधानी महोत्सवाअंतर्गत दि. 25 रोजी किल्ले अजिंक्यतार्‍यावर सकाळी 9 वाजता ‘शिवजागर’ या कार्यक्रमात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 100 मुलांचा सहभाग असून त्याचे उदघाटन राजमाता श्री छ.  कल्पनाराजे भोसले, खा. श्री  छ. उदयनराजे भोसले, श्री  छ. सौ.  दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.दि. 26 रोजी शाहू स्टेडियमवर युवागिरी व दि. 27 मे रोजी सातारा गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी 40 दिग्गज कलाकार सहभागी होऊन आपली कला  सादर करणार आहेत.

सातारा गौरव पुरस्कारामध्ये  श्री छ. प्रतापसिंहराजे जीवनगौरव पुरस्कार स्व. यमुनाबाई वाईकर, साहित्यिक व पत्रकारिता पुरस्कार रफिक मुल्ला,  कला व सांस्कृतिक पुरस्कार श्‍वेता शिंदे, क्रीडा क्षेत्र पुरस्कार ललिता बाबर,  क्रीडा क्षेत्र पुरस्कार नंदकुमार विभुते,  शिक्षण क्षेत्र पुरस्कार  माजी प्राचार्य पुरूषोत्तम शेठ,  उद्योजकता पुरस्कार अजित मुथा, आदर्श सेवा पुरस्कार बबनराव उथळे,  छोटे उद्योजकता पुरस्कार राजेंद्र घुले,   सामाजिक कार्य पुरस्कार माहेश्‍वरी ट्रस्ट,  विशेष कर्तृत्व पुरस्कार मेजर गौरव जाधव,  कृषी पुरस्कार संतोष सूर्यवंशी,  आदर्श ग्राम पुरस्कार हिवरे (ता. कोरेगाव),  पर्यावरण मित्र पुरस्कार विजय निंबाळकर यांना मान्यवरांच्या हस्ते  देऊन गौरविण्यात येणार  असल्याचे पंकज चव्हाण यांनी सांगितले. यावेळी रवी साळुंखे, सुनील काटकर, रंजना रावत, गीतांजली कदम उपस्थित होते.