Mon, Jul 22, 2019 00:45होमपेज › Satara › जिल्ह्यातील वातावरण पावसाळले

जिल्ह्यातील वातावरण पावसाळले

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 10:27PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

गेल्या चार दिवसांपासून पश्‍चिम किनारपट्टीला ओखी वादळाचा तडाखा  बसल्यामुळे  त्याचा प्रभाव जिल्ह्यातील वातावरणावरही झाला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी मंगळवारी दुसर्‍या दिवशीही पावसाच्या सरी कोसळल्या. ठिकठिकाणी अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या तर हवामान ढगाळ असल्याने हवेत गारठा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली होती.

दोन दिवसांपासून  राज्याच्या सागर किनारपट्टीवर ओखी वादळ घोंगावत आहे. सातारा जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून याचा प्रभाव जाणवत आहे. सोमवारी रात्रीही पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. तेव्हापासून शहर व परिसरात ढगाळ वातावरण आहे. मंगळवारी सकाळीही काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. अधून मधून पडणार्‍या या पावसामुळे हवेतही गारठा निर्माण झाला. 

मंगळवारी पावसाळ्याप्रमाणेच वातावरण निर्माण झाले होते. अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले होते. सकाळपासूनच थंड वारे वाहत होते त्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला होता. दिवसभर थंडी जाणवत असल्याने नागरिकांनी उबदार कपडे परिधान केले. दरम्यान, या पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा व अन्य पिकांना पाऊस चांगला असल्याचे कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

वाईत सलग दुसर्‍या दिवशी जोरदार पाऊस

वाई : प्रतिनिधी 

वाई शहरात मंगळवारी सलग दुसर्‍या दिवशीही जोरदार पाऊस  कोसळला. वाई तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून गेले दोन दिवस वातावरण ढगाळ बनले आहे. वाई परिसरात दिवसभर जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना चांगलाच फायदा होणार आहे.  या पावसामुळे ज्वारीला पाणी देण्याचा शेतकर्‍यांचा त्रास वाचला आहे.

दरम्यान, ढगाळ  हवामानामुळे वातावरणात बदल झाल्याने थंडी व तापाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. या पावसाने  हवेत गारवा वाढल्याने नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. मांढरदेव  परिसरातही  वादळी वार्‍यासह पाऊस होत असल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे.  तालुक्यात सध्या यात्रा  सुरू झाल्या असून या पावसाचा परिणाम यात्रांवर होऊ लागला आहे.

पाचगणीतही भुरभुर

भिलार : वार्ताहर

पाचगणी परिसरातही दुसर्‍या दिवशी पावसाने हजेरी लावली. दाट धुक्यामुळे  वाहनचालकाना रस्त्यावरून मार्गक्रमण करणे अवघड जात होते. पाचगणी, गुरेघर, भिलार परिसरात गेली दोन दिवस ढगाळ  वातावरण होते. परिसरात हलका  ते मध्यम स्वरूपात पाऊस पडत आहे. वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाल्यामुळे लोकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. येथील रस्ते तसेच डोंगर रांगांवर दाट धुके पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यातून मार्गक्रमण करताना अवघड जात होते. पाऊस व गारठ्यामुळे अनेक पालकांनी आपली मुले शाळेत पाठवली नाही. पावसाच्या भुरभुरीमुळे तसेच पाचगणी बाजारपेठेत फारशी गर्दी 
नव्हती.