होमपेज › Satara › अवकाळीच्या भीतीने बळीराजा धास्तावला

अवकाळीच्या भीतीने बळीराजा धास्तावला

Published On: Feb 08 2018 1:54AM | Last Updated: Feb 07 2018 11:23PMसातारा : प्रतिनिधी 

जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून अचानकच वातावरणाने नूर पालटला असून ढगाळ वातावरणाने अवकाळी पावसाची परिस्थिती ओढवली.  सातारा शहरासह वाई, महाबळेश्‍वर, पाचगणी भागात हलक्या पावसाचा  शिडकावा झाला. त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. 

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवू लागला होता. मंगळवार सायंकाळपासून ग्रामीण भागात अचानक कोंदट वातावरण निर्माण झाले. बुधवारी पहाटेपासून तर वातावरणाने नूरच पालटला. आभाळ पूर्णत: ढगाळून गेले. या वातावरणाने कुडकुडणारी थंडी गायब झाली.  पहाटेच्या सुमारास  सातारा शहरासह  जिल्ह्यातील वाई, महाबळेश्‍वर, पाचगणी भागात पावसाचा हलकासा शिडकावा झाला. उत्‍तरेकडील राज्याच्या दिशेने वाहत येणार्‍या थंड वार्‍याचा परिणाम कमी असल्याने थंडी कमी झाली असून रोगट वातावरणामुळे पिकाची हानी होण्याची भिती व्यक्‍त होत आहे.

सध्या जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिके जोमात आली असताना दिवसभर ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे रब्बी पिकावर रोग पडण्याची शक्यता शेतकरी बांधवातून व्यक्‍त होत आहे. तसेच ढगाळ वातावरणाचा फटका हरभरा, गहू, द्राक्षे, फळभाज्या याबरोबरच अन्य पिकांनाही बसणार आहे. आंब्याचा मोहोरही गळण्याचा धोका शेतकर्‍यांनी व्यक्‍त केला आहे. ढगाळ  वातावरणामुळे शाळू पिकांवर भुरशीजन्य रोग पडण्याची भिती असून भाजीपाला आणि तत्सम पिकावरही कमी जास्त प्रमाणात रोगाची लागण होण्याची भिती शेतकर्‍यांना निर्माण झाली आहे.