Thu, Jul 18, 2019 04:08होमपेज › Satara › अनाथाश्रमावर छापा, २० हून अधिक बालके ताब्यात

अनाथाश्रमावर छापा, २० हून अधिक बालके ताब्यात

Published On: Feb 22 2018 10:33PM | Last Updated: Feb 23 2018 1:17AMकराड : प्रतिनिधी

कोळे ता. कराड येथील अनाथाश्रमावर केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाच्या पथकाने छापा टाकून वीसहून अधिक बालके ताब्यात घेतली. गुरूवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या बालकांना शासकीय आश्रमात हलविण्याची कार्यवाही सुरू होती.

कोळे येथे जिजाऊ अनाथाश्रम आहे. समिर नदाफ आणि सलमा नदाफ हे आश्रम चालवतात. जिजाऊ बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हा आश्रम चालवला जातो. 25 एप्रिल 2015 ला नदाफ यांनी तीन अनाथ मुले सांभाळायला घेतली.

सध्या 20 हून अधिक मुले तेथे आहेत. यापैकी काही मुले या दांपत्याने दत्तक घेतल्याचे सांगितले जाते.

दिल्ली येथील केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाचे पथक गुरूवारी सातारा येथे दाखल झाले होते. या पथकाने सातारा येथील महिला व बालकल्याण विभागाला सोबत घेऊन सायंकाळी आश्रमावर छापा टाकला. यामध्ये केंद्रीय दत्तक प्राधिकरणचे अधिकारी शिवानंद, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा शालिनी जगताप, जिल्हा महिला बालकल्याण विभागाचे डी.एस. तिरमते, जिल्हा परिविक्षा अधिकारी ए.बी.शिंदे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी दीप्ती कुलकर्णी या पथकात सहभागी होते.

आश्रम चालविण्यासाठी जी आवश्यक शासकीय कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे होते ती केली गेली नसल्याचे तपासणी दरम्यान समोर आले. अन्य कोणत्या परवानग्या घेतल्या नसल्याचे चौकशीत समोर आले. त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय पथकाने स्थानिक पथकाला दिले आहेत. तसेच या आश्रमातील सर्व मुले ताब्यात घेऊन ती शासनमान्य आश्रमामध्ये हलविण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.