Thu, Jul 18, 2019 22:00होमपेज › Satara › जिल्ह्यात प्रश्‍नपत्रिका पॅकेजचा भुलभुलैय्या

जिल्ह्यात प्रश्‍नपत्रिका पॅकेजचा भुलभुलैय्या

Published On: May 09 2018 1:51AM | Last Updated: May 08 2018 7:34PMसातारा : मीना शिंदे

जिल्ह्यात सध्या खासगी क्लासचे पेव फुटले असून या शिकवणीकडे पालकांचाही कल वाढला आहे. अनेक  खासगी क्लास चालकांकडून विद्यार्थी निकालाची टक्केवारी वाढवण्याच्या अश्‍वासनावर स्वयंअध्ययनाच्या प्रश्‍नपत्रिकांचा भडिमार केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. गुणवत्ता वाढीसाठी पॅकेज भुलभुलैय्याच्या या फेर्‍यात पालक व विद्यार्थी गुरफटून गेले असून त्यांची सर्रास लूट केली जात असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. आपले पॅकेज गळी उतरवण्यासाठी काही क्लास चालक अतिरेकी पाठपुरावा करत असून त्यामुळे पालकवर्गाला अक्षरश: भंडावून सोडले आहे. 

माध्यमिकपर्यंतच्या परीक्षांचा हंगाम सद्या संपला असला तरी अजूनही महाविद्यालयीन परीक्षा सुरू आहेत. उन्हाळी सुट्टीमध्येही खासगी क्लास लावण्याकडे अनेकांचा कल असतो. आपला विद्यार्थी गुणवंत अन् ज्ञानवंत असावा, उद्याच्या आधुनिक युगाचा तो सारथी बनावा, अशी पालकांची अपेक्षा  असणे यात काहीही गैर नाही. मग विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी हे पालक खासगी क्लासकडे वळतात. वेगवेगळ्या पॅटर्नच्या नावाखाली अशा खाजगी क्लास चालकांचा सातारा शहरात चांगलाच बोलबाला आहे. गुणवत्ता वाढीसाठी प्रश्‍नपत्रिका पॅटर्न  पालकांच्या माथी मारण्याचे प्रकार वाढले  आहेत. 

खासगी क्लासेसमधून सर्वप्रथम जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन   दहावीत जाणार्‍या विद्यार्थ्यांचे फोन नंबर मिळवले जातात. ते मिळवणे फारसे अवघडही जात नाही. शाळा व्यवस्थापनच त्यांना ते मिळवून देते. मग हे क्लास संचालक विद्यार्थ्यांच्या पालकांना  त्या नंबरवर फोन करून विद्यार्थ्यांना दहावीत गुणांच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी मोफत वैयक्‍तिक मार्गदर्शन करणार असल्याचे सांगतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील शंका निरसन, हस्ताक्षर सुधारणा, अभ्यास करण्याच्या टीप्स देणार असल्याचे सांगतात. हे लोक मूळातच चतूर असतात. आपल्या संभाषण कौशल्यातून पालकांचा विश्‍वास संपादन करुन भेटण्याची वेळ घेतात.

बहुतांश परीक्षा पॅटर्न संचालक  दहावी विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यास समुपदेशन  वर्गांचं आयोजन करतात. समुपदेशनासाठी येणार्‍या विद्यार्थी व पालकांना अभ्यासाचे जुजबी मार्गदर्शन करुन आपला मोर्चा त्यांच्या पॅटर्नकडे वळवतात. प्रश्‍न पत्रिका घरपोच देवू, त्या उत्तर पत्रिका गोळा करुन तज्ञ शिक्षकांकडून तपासून आणून सुधारीत सुचना  देण्यात येतील, असेही सांगितले जाते. वार्षिक पॅटर्न विकत घेण्यासाठी गळ घालतात. किमान बुकिंग तरी करा, हमखास  टक्केवारी वाढेल, नाहीतर पैसे परत देवू, असा दावाही करतात. तसेच वारंवार फोन करुन प्रश्‍नपत्रिका पॅटर्न विकत घेण्यास प्रवृत्त करतात.  सर्व प्रश्‍नपत्रिका स्वयंअध्ययन करुन विद्यार्थ्यांना पुस्तकात बघून उत्तरे लिहायची असतात.  यातून कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन केले जाते, हा संशोधनाचाच विषय आहे. त्यामुळे या पॅकेजिंगमुळे पालक व विद्यार्थ्याची केवळ दिशाभूल करुन प्रश्‍नपत्रिकेच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याने सुज्ञ पालकांमधून संताप व्यक्‍त केला जात आहे.


अशी आहे पॅकेजिंगची फसवेगिरी

पॅटर्नमधून विद्यार्थी टक्केवारीवाढीच्या केवळ बाता

गुणवत्ता वाढीसाठी कोणतेही ठोस मार्गदर्शन नाही

अभ्यासाबाबत जुजबी मार्गदर्शन 

केवळ पैसे कमवण्यासाठी पॅकेज माथी मारण्याचा प्रयत्न

मोफत मार्गदर्शन, सेमिनारमधून ‘पॅकेजिंग’साठी गळ