Wed, Jun 26, 2019 11:23होमपेज › Satara › श्रीरामने 2650 दिले उपळवेने काय केले?

श्रीरामने 2650 दिले उपळवेने काय केले?

Published On: Jun 28 2018 1:41AM | Last Updated: Jun 27 2018 10:55PMफलटण : प्रतिनिधी

श्रीराम सहकारी साखर कारखाना आम्ही चालवायला दिला तेव्हा आमच्यावर टीका केली गेली. यावेळी फक्त श्रीरामने सर्वांच्या आगोदर 2650 रुपये दर दिला. मात्र, उपळवे कारखान्याने काय केले? असा सवाल करीत मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची अ‍ॅम्बुलन्स तयार ठेवा, असा टोला विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर यांनी  लगावला. दरम्यान हा टोला आ. जयकुमार गोरे का रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लगावला? याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.

कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट व लायन्स क्लब फलटण यांच्या संयुक्त सहभागाने शेतकरी आरोग्य  योजना, शेतकरी व्यासपीठ योजना, जय जवान-जय किसान योजना, बाजार समिती मोबाईल अ‍ॅप, व्यथा निवारण कक्षाचा शुभारंभ आणि बाजार समितीचे व्हा. चेअरमन महिला संचालक व सचिव चेंबरचा शुभारंभ अशा संयुक्त कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून ना.  रामराजे बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. दिपक चव्हाण होते. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. रेश्माताई भोसले, उपसभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, नगराध्यक्षा सौ. निताताई नेवसे आदी उपस्थित होते. 

बाजार समितीने शेतमालाच्या विक्रीची व्यवस्था करताना फळे, भाजीपाल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करुन त्याला रास्तदर आणि निर्यातीला प्राधान्य देणार्‍या यंत्रणेला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. शेतकरी व्यथा निवारण कक्षाच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याची भूमिका बाजार समितीने घेतली आहे. बाजार समिती, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स क्लब फलटणच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकर्‍यांना विविध सुविधा दिल्या जाणार आहेत, असेही ना. रामराजे यांनी साांगितले.

शेतकर्‍यांचे व्यासपीठ ही अनोखी संकल्पना स्वीकारुन बाजार समितीने शेती व शेतकर्‍यांच्या विविध समस्या, पीकासंबंधी मार्गदर्शन, शेतमाल विक्री, साठवणूक, बाजारभाव याबाबत त्या त्या क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शनउपलब्ध करुन देवून शेतकरी खर्‍या अर्थाने सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला आहे. बाजार समितीने उपलब्ध करुन दिलेल्या मोबाईल अ‍ॅपद्वारे शेतकरी आपल्या समस्या मांडणार आहेत त्याचबरोबर त्यांना बाजार समितीच्या कामकाजाची, आरोग्य विषयक सुविधांची, बाजारभावाची माहिती होणार आहे.तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याची सुविधा उपलब्ध झाली असल्याने शेतकरी आता आपल्या घरातून, शेताच्या बांधावरुनही या अ‍ॅपद्वारे आपल्या प्रश्‍नांची सोडवणूक करुन घेणार असल्याने श्रीमंत रघुनाथराजे यांनी आजच्या तंत्रज्ञान युगात शेतकर्‍यांना आघाडीवर नेवून ठेवण्याचा प्रयत्न केला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या राज्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पापैकी प्रत्यक्ष शिवारात पाणी पोहोचलेला धोम-बलकवडी हा एकमेव पाटबंधारे प्रकल्प असून त्याद्वारे फलटण तालुक्यातील कायम दुष्काळी पट्टा ओलीताखाली आणण्याचे श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यात आपण यशस्वी झालो आहोत. मात्र, या पाण्याचा योग्य वापर करुन आपली शेती फुलवा, असे आवाहन ना. रामराजे यांनी केले. 

आगामी काळात बाजार 

समितीच्या आवारात सुसज्ज 125 बेडचे हॉस्पिटल, व्यापारी संकुल आणि अन्य उपक्रम राबविण्याचा मनोदय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. प्रास्तविक सचिव शंकर सोनवलकर यांनी केले.  स्वागत व्हाईस चेअरमन भगवानराव होळकर यांनी केले व आभार मोहनराव निंबाळकर यांनी मानले. या वेळी सर्व संचालक, सभासद शेतकरी, कामगार व कर्मचारी उपस्थित होते.