होमपेज › Satara › पुढारीचा आणखी एक दणका : लुंगी डान्स प्रकरणी पोलिस निलंबित

पुढारीचा आणखी एक दणका : लुंगी डान्स प्रकरणी पोलिस निलंबित

Published On: Jan 23 2018 3:26PM | Last Updated: Jan 23 2018 3:26PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये सुरुची राडा प्रकरणात संशयित आरोपींनी मोबाईलवर प्रिझन वॉर्डमध्ये लुंगी डान्स केल्याचे प्रकरण दै.‘पुढारी’ने ओपन केल्यानंतर त्यावेळी बंदोबस्तासाठी असणार्‍या पोलिसांच्या अंगलट आले असून पोलिस कर्मचारी रजपूत यांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी निलंबीत केले. दै.‘पुढारी’ने ओपन केलेल्या लुंगी डान्स स्टींगचे हे मोठे यश असून आणखी तीन पोलिसांची चौकशी सुरुच आहे.

दोन दिवसांपूर्वी प्रिझन वॉर्डमध्ये संशयित आरोपींनी बिनधोकपणे मोबाईलच्या ठेक्यात लुंगी डान्स केल्याचे समोर आल्यानंतर ती व्हिडीओ दै.पुढारीने व्हायरल करुन त्याचे सचित्र वृत्तही प्रसिध्द केले. या घटनेने सातारा जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी गंभीर दखल घेत त्याठिकाणी पोलिसांना छापा टाकयला सांगितल्यानंतर प्रिझन वॉर्डमधून मोबाईल, पॉवर बँक, कॅरम अशा वस्तूही जप्त केल्यानंतर दै.पुढारीचे वृत्त तंतोतंत खरे ठरले. संशयित आजारी रुग्ण गाण्याच्या ठेक्यावर ताल धरल्याचे पाहून त्यांना नेमका कोणता आजार झाला आहे? असे सवालही उपस्थित झाले.

दरम्यान, संशयित आरोपींकडे मोबाईलसह विविध वस्तू सापडल्याने त्या पोलिस बंदोबस्तातून आत कशा गेल्या? असा सवाल दै.पुढारीने उपस्थित केला. याप्रकरणाचीही पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी प्रिझन वॉर्डबाहेर बंदोबस्तासाठी असणार्‍या पोलिसांच्या चौकशीचे सोमवारी आदेश दिले. प्राथमिक चौकशी सुरु असताना यामध्ये रजपूत पोलिस हे दोषी आढळल्याने त्यांना मंगळवारी निलंबीत करण्यात आले आहे. प्रिझन वॉर्डसाठी १ पोलिस हवालदार व ३ पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त असतो. यामुळे अद्याप तिघांची चौकशी सुरु आहे.

दै.पुढारीच्या निर्भिड रोखठोक भूमिकेमुळे समाजातून सर्वत्र कौतुक होत असून या प्रकरणाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.