Sat, Jun 06, 2020 10:13होमपेज › Satara › कर्जमाफी, जीएसटीमुळे सरकार गोंधळलेल्या अवस्थेत : चव्हाण

कर्जमाफी, जीएसटीमुळे सरकार गोंधळलेल्या अवस्थेत : चव्हाण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा घोटाळा आणि त्यातील भोंगळ कारभार महाराष्ट्राच्या इतिहासात मी पाहिलेला नाही. कर्जमाफी, जीएसटीमुळे सरकार पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे. शेतकर्‍यांपाठोपाठ व्यापारी व युवकही आत्महत्या करू लागले आहेत. यावर मुख्यमंत्र्यांचे  नियंत्रण नाही. एकजुटीने या सरकारला खाली खेचल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही, असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन प्रसंगी ते बोलत होते. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची आठवण व्हावी, अशी संकटमय परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. आज महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल आहे. उद्योग अडचणीत आहेत. युवकांना दिलेल्या आश्‍वासनापैकी एकही आश्‍वासन पूर्ण झालेले नाही.  रोजगार नाहीत, नवीन उद्योग न निघाल्याने बेरोजगारांची संख्या वाढली आहे. व्यापारी जीएसटीच्या आघातामुळे अजूनही सावरले नाहीत. व्यापारी मंडळींनी मोठ्या अपेक्षेने भाजपाला सत्तेवर  आणण्यासाठी मदत केली पण तो व्यापारी आज उद्ध्वस्त झाला आहे. 

सरकार पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे. कर्जमाफीची बोगस माहिती दिल्याचा आरोप मुख्यमंत्री राष्ट्रीयकृत बँकांवर करत आहेत. अधिकारी ऐकत नाहीत म्हणून ते हताश झाले आहेत. या बिकट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शेतकरी, युवकांनी एकजुटीने प्रतिकार करून सरकार खाली खेचल्याशिवाय आपली परिस्थिती बदलणार नाही असेही आ.चव्हाण म्हणाले.