Fri, Jul 19, 2019 05:03होमपेज › Satara › हॉटेलमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

हॉटेलमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

Published On: Feb 04 2018 1:58AM | Last Updated: Feb 03 2018 10:52PMकराड/ इस्लामपूर : प्रतिनिधी

वाळवा तालुक्यातील किल्‍लेमच्छिंद्रगड परिसरातील हॉटेल ओमसाई व पुणे-बंगळूर महामार्गावरील कासेगावजवळील हॉटेल सम्राट येथे छापा टाकून पोलिसांनी तिथे सुरू असलेल्या वेश्या  व्यवसायाचा पर्दाफाश केला. याप्रकरणी हॉटेल मालकासह सहाजणांना अटक करण्यात आली आहे, तर एकजण पसार झाला. एका अल्पवयीन मुलीसह चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व इस्लामपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री संयुक्‍तरीत्या ही कारवाई केली.  हॉटेल मालक- मदन संभाजी कदम (32, रा. रेठरे कारखाना), एजंट- सुयोग शंकर पाटील (38, रा. कार्वे नाका, मूळ गाव- धामणी, ता. पाटण), रुम बॉय सनी बाबुराव काळे (34, रा. जामखेड, जि. अहमदनगर), ग्राहक महेंद्र लक्ष्मण जगदाळे (वय 24, रा. मलकापूर, ता. कराड), व्यवस्थापक शुभम पोपट कांबळे (20, रा. नवेखेड,  ता. वाळवा), एजंट महेश महादेव सावंत (38, रा. जोशी गल्ली, आजरा, ता. कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

तर हॉटेल सम्राटचा मालक हणमंत वसंत माने (रा. कराड) हा पसार झाला आहे. यातील मदन कदम, सुयोग पाटील, सनी काळे, महेंद्र जगदाळे यांच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात तर हणमंत माने, शुभम कांबळे, महेश सावंत यांच्याविरोधात कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड-तासगाव रस्त्यावरील किल्‍लेमच्छिंद्रगड येथे हॉटेल ओमसाईवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे  पोलिस उपअधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस उपअधिक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली छापा घालण्यात आला.या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक प्रविण शिंदे, महिला उपनिरीक्षक प्रियांका सराटे व गुन्हे अन्वेषण विभागाकडील  भगवान नाडगे, विकास पाटणकर, लता गावडे, राहुल जाधव, कविता पाटील, अभिजीत गायकवाड, स्नेहल मोरे, पाटील तसेच इस्लामपूरचे पोलिस पथक यांनी भाग घेतला. शुक्रवारी रात्री बोगस ग्राहक पाठवून या ठिकाणी छापा टाकला. 

तसेच पुणे-बंगळूर महामार्गावर कासेगावजवळील मालखेड फाटा येथील हॉटेल सम्राटवरही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. यावेळी या दोन्ही हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले.  त्या ठिकाणी असलेल्या एका अल्पवयीन मुलीसह चार पिडीत महिलांची पोलिसांनी सुटका केली. हॉटेल ओमसाई मालकासह सहाजणांना अटक करण्यात आली. या सर्वांवर भारतीय दंड विधानाच्या कलम 307 अ, लैंगिक अत्त्याचार प्रतिबंधक कलम 12 व 15, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या चौघाजणांना न्यायालयाने हजर केले असता न्यायालयाने त्यांना  दि. 9 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक प्रताप मानकर अधिक तपास करीत आहेत.