Wed, Jul 24, 2019 08:09होमपेज › Satara › निधी खर्च मात्र औषधांचा तुटवडा

निधी खर्च मात्र औषधांचा तुटवडा

Published On: Mar 21 2018 1:43AM | Last Updated: Mar 20 2018 11:06PMसातारा : प्रविण शिंगटे

सातारा जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून आरोग्य विभागाला 2 कोटी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी त्यातील 86 टक्के निधी खर्च झाला असल्याचा आरोग्य विभागाने दावा केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक औषध पुरवठा करण्यासाठी 100 टक्के निधी खर्च झाला असला तरी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधाचा तुटवडा का भासत आहे. रूग्णांना वेळेवर औषधे उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला सेस फंडातून निधी मंजूर  असून 2 कोटी 55 लाख  मंजूर निधीपैकी 2 कोटी 20लाख 40 हजार रुपये खर्च झाले आहेत.सुमारे 35 लाख रुपयांचा निधी शिल्लक असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात येत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक औषधा पुरवठा करण्यासाठी 16 लाख 40 हजार रुपये, बामणोली  लाँच इंधन व दुरूस्तीसाठी  2 लाख 1 हजार रुपये खर्च झाले आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र दुरूस्ती व संरक्षक भिंत बांधण्यासाठी सुमारे 47 लाख 78 हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. मंजूर निधीपैकी फक्त 24 लाख 8 हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. मात्र केंद्राची जी दुरूस्ती झाली ती कामे चांगल्या दर्जाची झाली का? असा सवाल उपस्थित होत आहे. प्रा. आ. केंद्रांना साहित्य पुरवठा करण्यासाठी 35 लाख रुपये, फोन सुविधेसाठी 2 लाख 1 हजार रुपये, अतिरिक्त बाह्यरूग्ण शुल्कातून प्रा.आ. केंद्र दवाखाना सुधारणा करण्यावर 28 लाख 50 हजार रुपये खर्च झाले आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, तालुका व  जिल्हस्तरावर सर्व रोगनिदान शिबीर आयोजित करण्यासाठी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली मात्र  त्यापैकी 19 लाख 33 हजार रुपये खर्च झाले आहेत.आरोग्य विभागाच्या विविध योजनांसाठी 12 लाख रुपये खर्च झाले आहेत. श्‍वानदंश व  सर्पदंश लस पुरवठा करण्यासाठी फक्त 4 लाख  रूपयांचा निधी खर्च झाला असला तरी हा निधी कमी प्रमाणात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात श्‍वानदंश व सर्पदंश या लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. खाजगी दवाखान्यात  ही लस देण्यासाठी रूग्णांची आर्थिक लुट केली जाते त्यासाठी यावर्षीच्या बजेटमध्ये तरी श्‍वानदंश व सर्पदंश या दोन्ही लसीसाठी जादा तरतूद करावी, अशी मागणी नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

साथीच्या रोगावर नियंत्रण व उपाययोजना करण्यासाठी 7 लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र, जिल्ह्यातील कोणत्या गावात साथीच्या रोगावर नियंत्रण आणण्यास आरोग्य विभागाला कितपत यश आले? प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण करण्यासाठी 18 लाख 20 हजार रूपयांची तरतुद करण्यात आली होती त्यापैकी 10 लाख रुपयांचा निधी खर्च झाला मात्र  किती केंद्रांचे बळकटीकरण झाले ही बाब गुलदस्त्यातच आहे.कॅन्सर, हदयरोग व किडणी सारख्या दुर्दर रोगाने पिडीत गरीब रूग्णांना  आर्थिक मदत देण्यात 100 टक्के निधी खर्च झाला आहे.मुलगी वाचवा अभियान, वैभव लक्ष्मी स्त्री जन्माचे स्वागत करा योजनेवर सर्वच्या सर्व 7 लाख रुपये खर्च करण्यात आरोग्य विभाग यशस्वी झाला आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करणे, पाणी गुणवत्ता, संनियंत्रण, औषध, सादील, इंधन, वाहन दुरूस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्राचा बाग बगीचा सुशोभिकरण व कर्मचारी आरोग्य तपासणीसाठी 26 लाख 80 हजार रुपये खर्च झाले आहेत. मात्र जिल्ह्यातील 71 प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील किती बागांचे सुशोभिकरण झाले. वाहनांची दुरूस्ती झाली का? कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी झाली का ? असे विविध प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

मुळातच जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी ऑक्टोबरमध्ये हजर झाले. त्यानंतर निधी खर्चाबाबत कोणतेही नियोजन केल्याचे दिसून येत नाही. मार्च महिना जवळ आला की पैसे खर्च करण्याबाबत आरोग्य विभागाने धावपळ सुरू केली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. औषधे खरेदीवर सर्व निधी खर्च पडला असल्याचे दाखवण्यात आले असले तरी बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा भासत आहे याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर औषधे मिळावीत यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. बांधकाम विभागाने आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष केल्याने मोठ्या प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची बांधकामे रखडली आहेत. तसेच दुरूस्तीची कामेही वेळेवर होत नाहीत.

आरोग्य विभागातील गुणवंत अधिकारी व कर्मचार्‍यांना पुरस्कार देण्यासाठी 2 लाखाची तरतूद केली असली तरी जे प्रामाणिकपणे काम करत आहेत, अशा कर्मचारी व अधिकार्‍यांची आरोग्य विभागामार्फत पुरस्कारासाठी  दखल घेतली जाते का? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.  

Tags : satara, satara news, problem, drug shortage, primary health center