Fri, Apr 26, 2019 03:22होमपेज › Satara › सर्वसामान्‍यांचा आवाज म्‍हणजे दै. पुढारी : पृथ्वीराज चव्‍हाण  (व्‍हिडिओ)

सर्वसामान्‍यांचा आवाज म्‍हणजे दै. पुढारी : पृथ्वीराज चव्‍हाण  (व्‍हिडिओ)

Published On: Jan 08 2018 6:30PM | Last Updated: Jan 08 2018 6:30PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

नि:पक्ष व निर्भीड दैनिक म्हणून ओळख असलेल्या दैनिक पुढारीने महाराष्ट्रासह कर्नाटकच्या उत्तर भागात तसेच गोव्यातही आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. सर्वसामान्यांवरील अन्यायाविरूद्ध नेहमीच आवाज उठवत दै. "पुढारी'ने सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिल्याचे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले. पुढारी वर्धापनदिनानिमित्ताने सोमवारी कराड पुढारी कार्यालयास त्‍यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पुढारी कार्यालयात ग. गो.जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पुढारीचे संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांना यावेळी फोनवरून शुभेच्छा दिल्या.

आमदार चव्हाण यांनी कराड शहर, तालुका ते मुंबई, दिल्ली या ठिकाणच्या राजकारणापासून, बुलेट ट्रेन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्याबाबत मनमुराद गप्पा मारल्या. 

कराड दक्षिण मतदारसंघातून पुन्हा एकदा मी आहेच हे सांगताना सातारा लोकसभा मतदारसंघात कोण उभं राहणार आहे याबाबतही चिमटे घेतले.

यावेळी मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजीत चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दै. "पुढारी'ने पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर राज्यात अढळ स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्रासोबत कर्नाटकचा उत्तर भाग, गोवा या ठिकाणीही दै. "पुढारी' निर्भीडपणा जोपासला आहे. सातत्याने सर्वसामान्यांवरील अन्याय, त्यांच्या अडचणी, समस्या समाजासमोर मांडत त्यांची सोडवणूक होण्यात पुढारीने नेहमीच मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच आज सर्वसामान्यांचा आवाज म्हणून दै. "पुढारी'ने आपली वेगळी ओळख निर्माण करत ठसा उमटवला आहे.

"पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या आदर्शानुसार मार्गाक्रमण करत संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांच्यासह त्यांचे चिंरजीव डॉ. योगेश जाधव आज "पुढारी'ची धुरा वाहत आहेत. त्यामुळे भविष्यातही दै. "पुढारी'कडून दिनदुबळ्यांचा आणि सर्वसामान्यांचा आवाज समाजासमोर असाच परखडपणे मांडला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दै. "पुढारी'स वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.