होमपेज › Satara › ’भीमा कोरेगाव‘ दंगलीचे सूत्रधार शोधा : पृथ्वीराज चव्हाण  

’भीमा कोरेगाव‘ दंगलीचे सूत्रधार शोधा : पृथ्वीराज चव्हाण  

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 10:11PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी 

भीमा कोरेगाव प्रकरण हाताळण्यात सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. या दंगलीमागे कोणाची डोकी आहेत, या सूत्रधारांचा शोध सरकारने घ्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी ‘टीम पुढारी’शी  बोलताना केली. 

भीमा कोरेगाव येथे मोठ्या संख्येने अनुयायी येणार हे साहजिक होते. हे सरकारला माहीत असताना  सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच खबरदारी घेतली नाही. दंगल घडली त्या दिवशी हिंदुत्ववादी, धर्मांध शक्‍ती त्या ठिकाणी भगवे झेंडे घेऊन जमा झाले होते. याच्या मागचे सूत्रधार कोण हे सरकारने शोधून काढले पाहिजे. दंगल घडवून आणणारे त्या ठिकाणी होते की नव्हते, हे  फारसे महत्त्वाचे नाही, तर दंगलीचे षड्यंत्र कोणी रचले हे महत्त्वाचे आहे. हा पूर्वनियोजित कट असावा, असा संशयही त्यांनी व्यक्‍त केला. 

नागपूर येथे दीक्षा भूमीवर, तर दादर येथे चैत्यभूमीवर प्रतिवर्षी लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी जमा होत असतात. तेथील कार्यक्रम शांततेत पार पडतात. भीमा कोरेगाव येथेही यापूर्वीचा अभिवादन सोहळा शांततेत पार पडतो, मग यावर्षी ही दंगल घडण्याचे कारण काय? पहिला दगड मारणारे कोण आहेत? प्रकाश आंबेडकर यांनी जी नावे जाहीर केली आहेत, त्यांचा यामध्ये काही संबंध आहे का हे शोधण्याची गरज आहे मात्र सरकार त्यांचा शोध घेण्यास तयार नाही. कोणतीतरी धर्मांध शक्ती सामाजिक वातावरण दूषित करण्याचा, जाती धर्मात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. 

मोदी सरकारचे जनमत घसरत चालले आहे, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. गुजरात निवडणुकीत हे दिसून आले आहे. पंतप्रधान मोदी केवळ घोषणा करतात हे जनतेच्या लक्षात आले आहे. अनेक मोठ मोठ्या घोषणा केल्या. या पाठिमागे त्यांची भावना चांगली असेल पण घोषणांची पूर्तता होत नाही. काळा पैसा भारतात आणतो म्हटले होते, याला कोणाचाच विरोध नाही, पण तसे झाली नाही. नोटाबंदीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. आजही अर्थव्यवस्था सावरलेली नाही 

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी संसदेत हे भाकीत केले होते ते खरे ठरले. सरकारने अर्थव्यवस्थेचे जाहीर केलेले आकडे व देशाचा खालावलेला विकासदर यावरून स्पष्ट होते. सर्जिकल स्ट्राईकचा गाजावाजा केला असे सर्जिकल स्ट्राईक काँग्रेसच्या काळात अनेकवेळा झाले  होते. मात्र तणाव वाढू नये, किती अतिरेकी मारले गेले ही आकडेवारी सांगितली जात नाही, हा सरकारच्या गोपनियतेचा भाग असतो. मात्र भाजप सरकारने त्याचीही जाहिरातबाजी करून गाजावाजा केला. शपथविधीला परदेशातील लोक बोलावले,  पाकिस्तानला न बोलावता पंतप्रधानांच्या नातेवाईकांच्या लग्न समारंभात सामिल होण्याने भारत-पाक संबंध सुधारत नाहीत. जीएसटीमधील चुका आणि त्यामुळे व्यापारी व सामान्य लोकांना झालेला नाहक त्रास याबाबतही आ. चव्हाण यांनी मोदी सरकारवर टीका केली. 

नोटाबंदीने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त
मोदी सरकारने चुकीच्या पद्धतीने नोटाबंदी जाहीर केल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आजही अर्थव्यवस्था सावरलेली नाही. सरकारने अर्थव्यवस्थेचे जाहीर केलेले आकडे व देशाचा खालावलेला विकास दर यावरून हे स्पष्ट होते. सर्जिकल स्ट्राईकचा सरकारने गाजावाजा केला, असे सर्जिकल स्ट्राईक काँग्रेसच्या काळात अनेक वेळा झाले होते. तणाव वाढू नये व किती अतिरेकी मारले गेले हे सांगितले जात नाही, हा सरकारच्या गोपनीयतेचा भाग असतो; मात्र भाजप सरकारने त्याचीही जाहिरातबाजी केली. पाकिस्तानला न बोलावता जाऊन पंतप्रधानांच्या नातेवाईकाच्या लग्‍न समारंभात सामील होण्याने भारत-पाक संबंध सुधारत नाही, असा टोलाही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.