होमपेज › Satara › ग्रहणामुळे दवाखान्यात न नेल्याने गरोदर महिलेचा मृत्यू

ग्रहणामुळे दवाखान्यात न नेल्याने गरोदर महिलेचा मृत्यू

Published On: Aug 13 2017 2:03AM | Last Updated: Aug 13 2017 2:03AM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

भोसे, ता. कोरेगाव येथील अंजना प्रवीण माने (वय 28) या गरोदर महिलेला कुटुंबीयांच्या अंधश्रद्धेमुळे जीव गमवावा लागल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. पोटात प्रचंड दुखत होते,  श्‍वास घेण्यासही अडचण येत होती. मात्र, चंद्रग्रहण असल्याने तिला काही खायला द्यायचे नाही आणि घराबाहेर पडू द्यायचे नाही. अन्यथा पोटातील बाळाला काहीतरी होईल या भीतीपोटी सासरच्या मंडळींनी रूग्णालयात नेण्यास विलंब लावल्याने अंजना माने यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिघांवर कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ग्रहणामध्ये गरोदर मातेच्या उदरातील बाळाला काही त्रास होऊ नये म्हणून गरोदर मातेला कोणतेही काम न करता निवांत बसवले जाते, अशी अंधश्रध्दा आहे. या अंधश्रध्देपोटीच अंजना माने या सात महिन्याच्या गरोदर असलेल्या महिलेला प्रचंड पोटात दुखत असूनही व श्‍वसनाचा त्रास होत असतानाही सासरच्या मंडळींनी तिला ग्रहणाच्या भीतीपोटी रुग्णालयात दाखल करण्यास विलंब केला. ग्रहणाची भीती ही अशिक्षितपणामुळे समाजात पूर्वपारंपार चालत आली  आहे. ग्रामीण भागात आजही ग्रहणादिवशी गरोदर महिलेला कोणतेही काम करु दिले जात नाही. कारण यामुळे पोटातील गर्भावर त्याचा परिणाम होतो अशी अंधश्रध्दा आजही समाजात आहे. सोमवार दि. 7 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून चंद्रग्रहण सुरु झाले होते. परंतु, अंजना माने यांना रविवार दि. 6 रोजी सायंकाळपासूनच पोटात दुखू लागले होते. व श्‍वसनाचा त्रास होवू लागला होता. त्यामुळे त्यांना सातारा येथील डॉ. दाभोलकर यांच्या सहयोग हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते. 

यावेळी डॉ. शैला दाभोलकर यांनी अंजना यांची प्रकृती खालावत चालल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. परंतु, ग्रहणाच्या भीतीपोटी अंजनाची सासू व दिराने तिला रुग्णालयात दाखल न करता भोसे (ता. कोरेगाव) येथे पुन्हा घरी नेले. तसेच अंजनाचा पती प्रवीण माने हा सैन्यदलात कार्यरत आहे. त्याच्याशीही त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.  त्यामुळे सासू व दीर या दोघांनी अंजनाला दवाखान्यात न दाखल करता घरी नेले होते. 

त्यानंतर पुन्हा सोमवारी अंजना माने यांच्या पोटातील कळा खूप वाढल्याने त्यांना श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. हा त्रास सुरू झाल्यानंतर शेजारच्या लोकांनी ग्रहणामुळे त्यांना त्रास होत असेल काही घाबरू नका असा सल्ला दिला. या अंधश्रध्देमुळे सर्वांनीच त्यांच्याकडे दुर्लक्ष करून रूग्णालयात उपचारास नेण्यास टाळले. परंतु, रात्री त्यांची प्रकृती खूपच खालावल्याने अखेर अंजनाच्या आईला अपशिंगे येथून बोलवण्यात आले. तिने मुलीची प्रकृती बघताच पहाटे सहयोग हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्यावेळेस डॉ. दाभोलकर यांनी तिची प्रकृती प्रचंड खालावल्याने त्यांना संजीवन हॉस्पिटल येथे दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, अंजनाला संजीवन हॉस्पिटला दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. 

याप्रकरणी मयत अंजनाची आई प्रमिला संपत निकम यांनी मुलीच्या मृत्यूस सासू, दीर व काका यांना जबाबदार धरत या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ज्या सातारा जिल्ह्यातून व राज्यातून अंधश्रध्दा हद्दपार व्हावी यासाठी स्व. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पूर्ण हयात घालवली. त्यांच्याच जिल्ह्यामध्ये अंधश्रध्देपोटी एका गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याने हळहळ अन् संतापही व्यक्त होत आहे.