होमपेज › Satara › महाराष्ट्र केसरीत खटावच्या प्रशांतला ब्रॉंझपदक

महाराष्ट्र केसरीत खटावच्या प्रशांतला ब्रॉंझपदक

Published On: Dec 26 2017 1:52AM | Last Updated: Dec 26 2017 1:52AM

बुकमार्क करा

खटाव : प्रतिनिधी 

जाखणगाव (ता.खटाव) येथील मल्ल प्रशांत शिंदे याने पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ९७ किलो वजनी गटातुन ब्राँन्झपदक पटकावले. स्पर्धेपूर्वी चारच अगोदर वडिलांचे निधन होवूनही गावाच्या आणि जिल्ह्याच्या प्रोत्साहनामुळे कुस्ती स्पर्धा गाजविणाऱ्या प्रशांतने  सुवर्ण पदक आणि रौप्यपदक विजेत्यांप्रमाणेच  सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू होण्याच्या चारच दिवस आगोदर प्रशांतच्या वडीलांचे निधन झाले होते. कुस्तीमधले मुख्य प्रेरणास्थान त्याचे वडीलच होते. त्यांच्या जाण्याने प्रशांतची स्पर्धेत सहभागी होण्याची मानसिकताच राहिली नव्हती. तथापि, समस्त जाखणगावकर आणि कुस्तीपरिवारातील त्याच्या मित्रांनी दिलेल्या मानसिक पाठबळामुळे त्याचे मनोर्धैर्य पुन्हा उंचावले. स्पर्धेत मिळवलेले पदक हे त्याने त्याच्या स्वर्गीय वडीलांना अर्पण केले.  लहाणपणापासून घरची हालाखीची परिस्थिती अनुभवलेल्या प्रशांतचा पदकापर्यंतचा प्रवास हा खरोखरच संघर्षमय आणि अनेक खाचखळग्यांनी भरलेला आहे. वडीलांच्या मृत्यूच्या आगोदर मिरज हॅास्पिटलमध्ये दहा,बारा दिवस त्यांची सेवाश्रूषा करण्यात त्याचा वेळ गेला. स्वाभाविकच त्याला स्पर्धेच्या तयारीसाठी कसलाही सराव करता आला नाही. तसेच त्या अनुषंगाने अत्यावश्यक असलेला खुराक त्याला मिळाला नव्हता. एव्हाना त्याने स्पर्धेत सहभाग घेण्याचा विचारच डोक्यातून काढून टाकला होता. दुर्दैवाने वडीलांची प्रकृती दिवसेंदिवस खालावतच चालली होती आणि स्पर्धेला केवळ चार दिवस बाकी आसताना वडील हे जग सोडून गेले.

मानसिकदृष्ट्या खचुन गेलेल्या प्रशांतला जाखनगावचे ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराने पुन्हा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उभारी दिली. गेले पंधरा दिवस ना सराव ना खुराक त्याच प्रमाणे खचलेल्या मनस्थितीत असलेला प्रशांत स्पर्धेत लक्षवेधक कामगिरी करेल का ही शंका कुस्तीक्षेत्रातील जाणकारांच्या मनात निर्माण झाली होती.तथापि, प्रशांतने सलग तीन फेऱ्यांमधे  डाव प्रतीडाव करत प्रतिस्पर्धकांवर केलेली मात पाहुन  उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. वडीलांच्या निधनाला चारच दिवस झालेले आसताना केवळ गाव आणि जिल्ह्याच्या नावासाठी प्रशांत स्पर्धेत सहभागी झाल्याचे कळले तेव्हा चक्क सुवर्ण पदक आणि रौप्यपदक पटकावलेल्या मल्लांच्या डोळे देखील पाणावले. साहजिकच काहीक्षण संपुर्ण वातावरण भारावून गेले होते.