होमपेज › Satara › पोक्सोतील संशयिताला जामीन

पोक्सोतील संशयिताला जामीन

Published On: Dec 07 2017 1:30AM | Last Updated: Dec 06 2017 10:26PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

पोक्सो प्रकरणातील संशयित आनंद पवार याचा मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला  असून यामुळे सातारा शहर पोलिस तोंडघशी पडले आहे. पुणे विभागीय कार्यालयातील उपायुक्त अजित पवार यांच्यावर कारवाई होण्यापूर्वीच मुख्य संशयिताला जामीन अर्ज मंजूर झाल्याने पोलिसांच्या तपासाबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, पोक्सो प्रकरणात सातारा पोलिसांची इतर संशयितांच्याबाबतीत कारवाईस चालढकल कायम राहिल्याने त्याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

सातार्‍यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात आनंद पवार (रा.आरफळ ता.सातारा) याच्याविरुध्द ऑगस्ट महिन्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. अखेर संशयित आनंद पवार हा 11 ऑक्टोबर रोजी याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशीला सुरुवात केल्यानंतर तपासामध्ये उपायुक्त अजित पवार व सातार्‍यातील बिल्डर संदीप चव्हाण यांनी संशयित आंनद पवार याला मदत केल्याचे समोर आले. संशयित आनंद पवार याला जामीन झाल्याने आ.निलम गोर्‍हे व सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे कोणती भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

संशयित आनंद पवार हा यापूर्वी जिल्हा न्यायालयात जामीनासाठी गेला होता. मात्र जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने त्याच्यापुढे उच्च न्यायालयाचा पर्याय होता. त्यानुसार तो उच्च न्यायालयात गेला व त्याला जामीन झाला आहे. मंगळवारी त्याबाबत सुनावणी व निर्णय झाला आहे.

पोलिस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष..

सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेले पोक्सो प्रकरण हे हायप्रोफाईल आहे. महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी व बिल्डरचा समावेश असल्याने पोलिस संशयितांना अटक करणार का? असा सवाल उपस्थित झाला होता. तपासामध्ये रत्नागिरी येथील तहसील कार्यालयातील कारकूनाने उपायुक्त अजित पवार यांनी फोन केल्याने संशयित आनंद पवार याला शासकीय विश्रामगृहात सुट दिल्याचा जबाब दिला आहे. अशा अनेक बाबी गंभीर स्वरुपाच्या असतानाही पोलिस गेली 55 दिवस कारवाईचा बाउ करत राहिली.

या वेळेत अनेक ‘घडामोडी’ झाल्या आहेत. आम्ही करतो मारल्यासारख तुम्ही करा रडल्यासारख, असा हा प्रकार झाल्याने त्याबाबत संतापाची लाट आहे. नुकतेच पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासमोर अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी पोक्सो प्रकरणात उर्वरीत संशयितांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. आता संशयित आनंद पवार याला जामीन झाल्याने पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे.