सातारा : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व पोक्सोप्रकरणी अक्षय चंद्रकांत दगडे (वय 22, रा. भिरडाचीवाडी, ता. वाई) याला तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. व्ही. घुले यांनी 10 वर्षे सक्तमजुरी व 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला. दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेतील मुलगी गर्भवती राहिल्याने प्रसूतही झालेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, एप्रिल व मे 2015 या दोन महिन्यांत अत्याचाराची घटना घडली होती. पीडित मुलगी 13 वर्षांची असून, ती खंडाळा तालुक्यातील आहे. 2015 मध्ये भिरडाचीवाडी येथे ती गेली होती. त्यावेळी अक्षय दगडे याने त्या मुलीला घरी बोलावून नेले व तिच्यावर अत्याचार केले होते.
या घटनेने मुलगी घाबरली मात्र अक्षय याने याबाबत कुठे वाच्यता झाल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती.घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्या मुलीने कोणालाही सांगितले नाही. पुढे मुलगी गर्भवती राहिली व तिची प्रसुतीही झाली होती. अखेर त्या मुलीने भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार दाखल झाल्यानंतर या घटनेचा सपोनि नारायण पवार, सपोनि जी.के.मोरे व फौजदार रेखा दुधभाते यांनी तपास करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सुनावणीदरम्यान सरकार व बचाव पक्षाने जोरदार युक्तिवाद केला. याप्रकरणात एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन अक्षय दगडे याला शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड.उर्मिला फडतरे यांनी काम पाहिले. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार शिरीष मोरे, शमशुद्दीन शेख, अविनाश पवार, अजित शिंदे, नंदा झांझुर्णे, कांचन बेंद्रे यांनी सहकार्य केले.