Thu, Apr 25, 2019 12:00होमपेज › Satara › सातारकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न होणार साकार

सातारकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न होणार साकार

Published On: Feb 25 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 11:06PMखेड : वार्ताहर

इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार आणि खूप वर्षापासून सातारकरांचे स्वप्न असलेल्या पोवईनाका येथील उड्डाणपूलाचे (ग्रेड सेपरेटर) भूमीपूजन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. दरम्यान, या कार्यक्रमाने सातारा शहर विकासाच्या महायज्ञाला प्रारंभ झाला आहे. 

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी सातारा शहरातील काही विकासकामांची भूमीपूजनाने झाली. त्यापैकी सातारकरांचे अनेक वर्षे स्वप्न असलेल्या पोवई नाका येथील उड्डाणपूलाचे (ग्रेडसेपरेटर) भूमीपूजन  करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय शिवतारे, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. शंभूराज देसाई, आ. आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम,  उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के,  अ‍ॅड. डी. जी. बनकर,अशोक सावंत, जितेंद्र खानविलकर, प्रताप शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. 

खा. उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे पोवई नाक्यावरील वाहतुकीचा ताण हलका होण्यासाठी ग्रेड सेपरेटर करण्यात येणार असून सुमारे 60 कोटी रुपयांचे हे काम केंद्रीय मार्ग निधीतून होणार आहे. या ग्रेड सेपरेटरमुळे वाहतूक सुलभ होवून राजपथावरुन बसस्थानकाकडे जाणे अधिक सोपे होणार आहे तसेच अडथळे दूर झाल्याने या मार्गावरील जलद वाहतूक शक्य होणार आहे. येत्या दोन वर्षात हे नियोजन प्रत्यक्षात उतरणार आहे. 

दरम्यान या विकासकामाच्या महायज्ञामुळे सातारा शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून सातारकरांचे स्वप्न प्रत्यक्षात पूर्णत्वास जाणार आहे.