Sat, Jan 19, 2019 22:26होमपेज › Satara › पॉस मशिनमुळे रेशन दुकानदार अडचणीत 

पॉस मशिनमुळे रेशन दुकानदार अडचणीत 

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 9:48PM

बुकमार्क करा

कातरखटाव : वार्ताहार

रेशन धान्य दुकानदारांना जाचक अटीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पॉस मशिनमुळेही अडचणी वाढल्या आहेत. यासह विविध मागण्यांचे गार्‍हाणे खटाव तालुक्यातील रेशन धान्य दुकानदारांनी तहसीलदारांकडे मांडले. 

खटाव तालुक्यातील रेशन धान्य दुकानदारांची बैठक होवून त्यामध्ये येणार्‍या विविध अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, उपाध्यक्ष दिलीप घार्गे, सचिव प्रशांत शेटे, खजिनदार महेश इनामदार, सरचिटणीस मनोहर लावंड, दादासाहेब कदम आदी उपस्थित होते. 

2013 साली तयार झालेल्या ग्राहक याद्यांचे फेर सर्वेक्षण करण्यासाठी संबंधित विभागास आदेश द्यावेत. रेशन धान्य दुकानातील पीएचएच कार्डाच्या अपेक्षित इष्टांकानुसार लोकसंख्या कमी करण्याबाबत संबंधित गाव कामगार तलाठी यांना सर्वेक्षणासाठी आदेश द्यावेत व त्यांच्याकडून तयार याद्या तहसीलदारांच्या सही शिक्क्यांनीशी संबंधित रेशन धान्य दुकानदारांकडे द्याव्यात. 

एनपीएच  व एपीएल कार्ड धारकांना रेशन मिळावे, रॉकेल परवानाधारकांना रॉकेलचा कोटा वाढवून मिळावा तसेच एक सिलिंडर धारक ग्राहकांनाही रॉकेल वितरित करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. नवीन मंजूर करण्यात आलेल्या कार्ड धारकांना रेशनधान्य मिळावे, वाढलेल्या लोकसंख्येनुसार रेशनधान्य दुकानांना वाढीव रेशन धान्य कोटा मंजूर व्हावा, आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.   तालुक्यातील ग्रामीण भागात असणार्‍या गावातील रेशन दुकानातील इ पॉस मशिन इंटरनेटच्या नेटवर्क प्रॉब्लेममुळे अखंडितपणे कार्यरत राहत नसल्याने रेशन धान्य दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी माहितीही निवेदनात देण्यात आली आहे.