Mon, Jun 01, 2020 00:35होमपेज › Satara › पृथ्वीराज चव्हाणांचे खच्चीकरण करण्यात भाजपला यश

पृथ्वीराज चव्हाणांचे खच्चीकरण करण्यात भाजपला यश

Published On: Sep 12 2019 9:27AM | Last Updated: Sep 12 2019 9:27AM
कराड : सतीश मोरे

गेली ४० वर्ष सावलीप्रमाणे साथ देणारे आमदार आनंदराव पाटील यांच्यासारखा निष्ठावंत कार्यकर्ता गट सोडण्याच्या तयारीत असल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जबरदस्त धक्का बसला आहे. आनंदराव पाटील यांच्या जाण्याने विधानसभा निवडणुकीत परिणाम होईल किंवा होणार नाही? याचे उत्तर दोन महिन्यांनी मिळणार असले तरी सध्यस्थितीत पृथ्वीराज चव्हाण यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करण्यात भाजप यशस्वी ठरला आहे.

दरम्यान, आनंदराव पाटील गट सोडून गेल्यानंतर विलासराव पाटील -उंडाळकर गट जवळ येईल? या आशेकडे पृथ्वीराज चव्हाण गट डोळे लावून बसला आहे.

पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ पारदर्शक कारभाराचे प्रशासक मुख्यमंत्री म्हणून राज्यभर लोकप्रिय होते. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात घेण्यात आलेले अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची लोक अजूनही चर्चा करतात. २०१४ साली राज्यात काँग्रेससह राष्ट्रवादीचा धक्कादायक पराभव होऊन भाजप- शिवसेना सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे सुरूवातीपासूनच सौदार्हायाचे संबंध आहेत. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने टप्पाटप्प्याने राज्यात आपली पाळेमुळे घट्ट केली. महापालिका, नगरपालिकांसह गावागावात भाजपचा गट निर्माण केला.

या दरम्यान, काँग्रेस- राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांचा झालेला पराभव आणि त्याचवेळी तिसर्‍या माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करण्याची भाजप नेत्यांची वल्गना बरेच काही सांगून गेली. अशा सर्व परिस्थितीत पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या अभ्यासू व दिग्गज नेत्याला भाजपा आपलेसे करू शकत नव्हते अथवा त्यांच्यावर आरोपही करू शकले नाही. राज्य पातळीवर काँग्रेस नेत्यांच्या यादीत पृथ्वीराज यांचे नाव अग्रक्रमावर राहिले.

पृथ्वीराज चव्हाण यांचे खच्चीकरण करताना लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष पक्षात घेऊन त्यांना विजयी करण्यात भाजपाने सर्व आयुधे वापरली. त्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे आ. जयकुमार गोरे, धैर्यशील कदम यांच्यासह अनेकांनी भाजपची वाट धरली आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव दिग्गज नेते असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण मतदारसंघात खेळवून ठेवण्यासाठी मागील वर्षभरापासून चंद्रकांत पाटील यांनी कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शेखर चरेगावकर, डॉ. अतुल भोसले यांना याकामी पूर्ण स्वातंत्र्य देत भाजपने पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गात अडचणी आणल्या.

पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमध्ये गुंतवून ठेवताना भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सतत चव्हाण यांच्यावर वैयक्तिक टिका केली. त्याचबरोबर डॉ. अतुल भोसले यांची ताकद वाढविण्यासाठी राज्यमंत्री दर्जाबरोबरच मागेल तेवढा निधी दक्षिणला दिला. दरम्यान विकासकामाच्या फलक बाजीनंतर विकासकामांबाबत श्रेयवादाच्या फैरी पाटणनंतर कराड दक्षिणमध्ये झडू लागल्या. चव्हाण यांच्या गटात सुरू असलेल्या बारीक हालचालीवर भाजपा नेत्यांचे लक्ष होते. आनंदराव पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून संबंध दुरावले होते. त्यातून फायदा उठवण्यासाठी डॉ. अतुल भोसले यांनी राजकीय कसब पणाला लावले होते. दरम्यान चव्हाण यांचे काही जवळचे कार्यकर्ते भाजपात दाखल झाले. तर आनंदराव पाटील यांच्याशी गुप्त चर्चा भाजपाच्या नेत्यांनी सुरू ठेवल्या.

नंदराव पाटील यांच्या नाराजीचा फायदा घेण्यासाठी डॉ. अतुल भोसले यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे आनंदराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेल्या भेटीने स्पष्ट झाले आहे. कोणालाही विश्वास बसणार नाही, अशी अनपेक्षित घटना घडवून आणण्यात भाजप यशस्वी झाला आहे. आनंदराव पाटील भाजपात जाऊ शकतात, गुरू पृथ्वीराज चव्हाण यांची साथ सोडू शकतात हे कटू सत्य पृथ्वीराज चव्हाण यांना पचवावे लागण्याची शक्यता आहे. चव्हाण यांना जवळच्या लोकांनाही सांभाळता येत नाही, जिल्ह्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय काँग्रेसकडे कोणी नेताच राहिला नाही. त्यामुळे काँग्रेसमुक्त जिल्हा करण्याचे भाजपाचे स्वप्न साकार करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अतुल भोसले यांनी केलेल्या प्रयत्नाला काही प्रमाणात यश आल्याचे म्हणावे लागेल. पृथ्वीराज चव्हाण यांना आनंदराव पाटील सोडून गेल्याने काय फटका बसेल? किती मते कमी होतील अथवा वाढतील? यापेक्षा माजी मुख्यमंत्र्यांना घरातील माणसे सांभाळता येत नाहीत? असा संदेश राज्यभर पोहोचवण्यात भाजपा यशस्वी ठरला आहे. 

आनंदराव पाटील हे उद्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान, आनंदराव पाटील यांना परत मागे आणण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे सध्याचे निकटवर्तीय फारशे उत्सुक दिसत नाहीत.

बुधवारी दिवसभर चव्हाण यांच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधला असता आनंदराव पाटील यांच्या जाण्याने फारसा फरक पडणार नसून आम्हाला यामुळे फायदाच होणार असल्याचा विश्वास काहींनी व्यक्त केला. मलकापूर निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव पाटील- उंडाळकर गट एकत्र आला होता. आनंदराव पाटील यांच्या जाण्याने विधानसभा निवडणुकीतही हे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी वरिष्ठांकडून प्रयत्न केले जातील, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. मात्र चव्हाण यांनी यावर अजून कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आनंदराव नानांना प्रेमाचे किंवा भावनाविवश आवाहन करून पृथ्वीराज चव्हाण त्यांची मनधरणी करू शकतात. असे काहींना वाटते. मात्र नाना परत आले तरीही पूर्वीसारखी मने जुळणार नाहीत हेही तितकेच स्पष्ट आहे. त्यामुळेच काँग्रेससह भाजपासाठी आगामी दोन ते तीन दिवस महत्त्वपूर्ण ठरणार असून हे दिवस जिल्ह्यासह कराडच्या राजकारणाची दशा व दिशा ठरवणार आहेत.